सावधान ..... ‘बिबट्या’ येतोय !

 



सावधान ..... 'बिबट्या' येतोय ! 


 


मराठीत नाविन्यपूर्ण कथानकांवर मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होत असते. मनोरंजनासोबतच वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगळ्या हटके विषयांना प्राधान्य दिले जात आहे. असाच एक वेगळा प्रयत्न संस्कृती कलादर्पण संस्थेचे  अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे करीत असून ते लवकरच 'बिबट्या' हा चित्रपट घेऊन येत आहेत. स्वयंभू प्रोडक्शन निर्मित आणि चंद्रशेखर सांडवे दिग्दर्शित 'बिबट्या' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील शिवणी कोतल या ग्रामीण भागात नुकतेच पूर्ण झाले.


 


बिबट्याचा शहरी अथवा ग्रामीण भागातील वावर आता दुर्मिळ गोष्ट नाही. वर्तमानपत्रातून, टीव्हीवर या संबंधीच्या बातम्या आपण सातत्याने पहात असतो. या पार्श्वभूमीवर 'बिबट्या' चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार? याची उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अनाजी पंतांची भूमिका साकारणारे अभिनेते महेश कोकाटे यांनी खलनायकाची भूमिका साकारली असून सोबत एका वेगळ्या भूमिकेत अभिनेते विजय पाटकर दिसणार आहेत. यांच्या सोबतीला प्रमोद पवार, प्रवीण तरडे, अशोक कुलकर्णी, सचिन गवळी, सोमनाथ तडवळकर, सुबोध पवार, सुशांत मंडले, आकाश माने, सुहास रुके, प्रियंका कासले, शिवाजी रेडकर, आकांक्षा जाधव, प्रतिभा शिंपी, प्रिया साठे, वर्षा पटेल, अंतरा पाटील इत्यादी कलाकारांनी काम केले असून या सिनेमात शुभम पाटील आणि सुप्रिया पाटील यांच्या रूपात नवी दमदार जोडी पहायला मिळेल.


 


'बिबट्या' सिनेमाची कथा–पटकथा चंद्रशेखर सांडवे यांचे असून संवाद कमलेश खंडाळे यांचे आहेत. छायाचित्रण गणेश पवार तर संकलन निलेश गावंड, पूजा सावंत यांचे आहे. गीतकार सुबोध पवार यांच्या गीतांना  संगीतकार विजय गटलेवार यांनी संगीतबद्ध केले आहे. गायक योगेश रणमाळे, अमृता दहिवलकर, विजय गटलेवार ,दिशा मुद्दा यांनी यातील गाणी गायली आहेत. नृत्यदिग्दर्शन ज्योती थोरात, शीतल माने, योगेश यांचे आहे. कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचे असून वेशभूषा मकरंद सुतार यांची आहे.


 


प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी 'बिबट्या' सज्ज होत असून महाराष्ट्रातील चित्रपटगृहात तो लवकरच धुमाकूळ घालणार आहे.