कलाप्रेमींकरिता आयोजित पुणे आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात
पुणे, : सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीने जगभरातील नवख्या आणि उत्साही कलाकारांसाठी पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजक गणेश केंजळे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवार ते रविवार (ता.२६ ते २९) दरम्यान कोथरुड येथील पंडित फार्म्स येथे कलाप्रेमींसाठी दररोज सकाळी १० वाजेपासून खुले राहणार आहे. प्रदर्शनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून फेस्टिव्हलचे उद्घाटन नितीन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सीमाशुल्क व जीएसटीचे सहआयुक्त हेमंतकुमार तंतिया, डॉ. के. एच. संचेती, ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ, महापौर मुरलीधर मोहोळ, खा. गिरीश बापट, सेलिब्रिटी अँबेसिडर अक्षय परांजपे, सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाने फेस्टिव्हलची सुरुवात झाल्यानंतर प्रदर्शनाचा भाग असलेल्या कलाकारांचा परिचय करून देण्यात आला. या दरम्यान विख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी एनडिज फिल्म वर्ल्डचे प्रमुख नितीन देसाई यांची मुलाखत घेऊन फेस्टिव्हलची रंगत वाढवली. त्यांनतर दुपारी तीन वाजता कलाकारांची भाषणे आणि प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात संवाद साधण्यात आला. फेस्टिव्हलची सायंकाळ ही सरोद, पखवाज, तबला जुगलबंदीने सुरू होऊन मध्यंतरात वासुदेव कामत यांची चित्रकला, प्रशांत गायकवाड यांची शिल्पकला आणि गिरीश चरवड यांचे कला सादरीकरण झाले. या दिवसाची सांगता आंतरराष्ट्रीय बॉलीवुड घराना अभिजित पोहोनकर यांच्या सादरीकरणाने झाली.
या प्रदर्शनात चित्रकलेपासून शिल्पकला, क्राफ्ट, छायाचित्रकला अशा विविध कलांची निवड करून हौशी, व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आणि विद्यार्थी कलाकार यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी (ता.२७) अकरा वाजता अकबर मोमीन यांच्या थ्री डी रांगोळीचे लाईव्ह डेमो प्रदर्शन होणार असून दुपारी तीन वाजता चित्रकार स्पीड आणि मिरर पेंटिंग कलाकार साहिल लाहरी यांचे लाईव्ह डेमो दाखवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता कल्लाकर फॅक्टरीचा फॅशन शो होणार असून साहिल लाहरी, मुस्कान, प्रणव, बी स्ट्रीट क्रू यांच्या संघातर्फे कला सादरीकरण होणार आहे. या दिवसाचा शेवट गायत्री सपरे ढवळे आणि कुमार करंदीकर यांच्या आवाजात सुफी आणि गझल गायन होणार आहे. फेस्टिवलचे शेवटचे दोन दिवस राहुल ठाकरे या आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या कलाकाराचे अविरत लाईव्ह सादरीकरण चालू राहील.
फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) अकरा वाजता प्रीती यादव यांचा पेंटिंग आर्ट डेमो होणार असून स्वप्ना माळवदे यांच्या ऑईल पेंटिंग कलेचे सादरीकरण होणार आहे. दुपारी तीन वाजता विख्यात कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता बिग बॉस फेम पराग कान्हेरे यांचा डोळ्यावर पट्टी बांधून पंचपक्वान्न थाळी तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. साडेसात वाजता बॉलीवुड धमाका करण्यासाठी प्रेम कोतवाल आणि टीमतर्फे दिवसाचा शेवट होणार आहे. फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी (ता. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता राजू कुलकर्णी यांचे इन्स्ट्रुमेंटल सादरीकरण होणार आहे. तसेच, नाविन्य कायम ठेवण्यासाठी डान्सिंग पेंटर विष्णु मर्देकर यांचे सादरीकरण होणार आहे. फेस्टिवलचा रंगतदार समारोप करण्यासाठी साडेसात वाजता वैशाली सामंत आणि टीमच्या वतीने सांगीतिक मेजवानी सादर होणार आहे.
जगभरातील कला एकाच व्यासपीठावर साजरी करण्यासाठी या प्रदर्शनात देशातील सर्व कला श्रेणीतील प्रवेशांचे स्वागत असेल पण त्याचबरोबर, किमान ४० टक्के कलाकार हे इतर देशांतील असतील. प्रदर्शनाच्या माध्यमातून 'मर्यादेपलीकडची कला, बंधने आणि शैली' यांना विशेष स्थान देऊन स्वत:ला कलाकार म्हणून पाहणाऱ्या आणि इतरांच्या कलेचा आदर करणाऱ्या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे. तसेच, पीएएफ कला प्रदर्शनात कलेचे सौंदर्य वाढविण्यासाठी शारीरिक आव्हानांवर मात केलेल्या कलाकारांसाठी एक विशेष विभाग ठेवण्यात आला आहे.
पीएएफमध्ये विवेकी प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणून उदयोन्मुख आणि स्वतंत्र कलाकारांच्या कलाकृती सादरीकरणासाठी कमीत कमी २०० गॅलरीज असून सदर प्रदर्शनास जगभरातील कला विक्रेते (आर्ट डीलर्स), कला ग्राहक (आर्ट बायर्स), कला तज्ञ, इंटिरियर डिझाइनर्स, वास्तुविद्याविशारद आणि आर्ट रसिक भेट देणार आहे. या दरम्यान चर्चासत्र (पॅनल डिस्कशन), कलेचा लाईव्ह डेमो आणि हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.
कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा फेस्टीव्हल एक संधी ठरणार आहे. या ठिकाणी रसिकांना 'आर्ट मेला'च्या अंतर्गत हजाराहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना ५ हजाराहून अधिक कला प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. याशिवाय, हा फेस्टीव्हल कलाकार आणि रसिकांकरिता अधिक मनोरंजक बनवण्यासाठी फॅन फेस्ट, फूड फेस्टिवल, फॅशन शो, एन्टरटेन्मेंट झोन, प्ले एरिया, सुफी नाईट,रोबोटिक्स आणि लाईव्ह कॉन्सर्टचेही आयोजन करण्यात आले आहे.