*जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*
*कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे*
*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*
पुणे, दि.29: हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या नागरिकांना आवश्यक सुविधा देवून हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री राम यांनी कालच पेरणे जयस्तंभ व वढू येथे भेट देवून अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. या तयारीची माहिती देण्यासाठी श्री. राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.
*नागरिकांसाठी विविध सुविधा*
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. कार्यक्रमास मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभाग योग्य त्या उपाययोजना करत असून यासाठी प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
*जयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी 24 लाख रुपयांच्या निधीतून चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत.
* 48 लाख रुपयांच्या निधीतून जयस्तंभ परिसरात कायमस्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत.
* मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे.
* 100 टँकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
* 500 फिरते स्वच्छतागृह असणार आहेत.
* 12 ओपीडी सेंटर्स, 20 रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे.
* बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.
* 15 ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे.
* याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन विभागाबरोबरच संबंधित विभाग याठिकाणी योग्य ती भूमिका बजावण्यासाठी कार्यरत आहेत.
*नागरिकांसाठी 260 बसेसची व्यवस्था-* जयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.31 डिसेंबर 2019 व 1 जानेवारी 2020 रोजी एकूण 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
पेरणे येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2019 व 1 जानेवारी 2020 रोजी एकूण 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक या बसेस करतील. त्यापैकी 60 बस दि.31 डिसेंबर 2019 रोजी व 200 बस दि. 1 जानेवारी 2020 रोजी उपब्ध असतील, यात 30 मिनीबसचा देखील समावेश असेल.
*सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.
तसेच 1 जानेवारी रोजी ड्रायडे घोषित करण्यात येत आहे. लोणीकंद आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, भिमा कोरेगांव, शिक्रापूर, सणसवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री बंदी बाबत आदेश देण्यात आले आहेत.
वाघोली येथील 31 डिसेंबर रोजी होणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. 740 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी प्रशासनाला सहकार्य करणार असून याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले.
*नागरिकांच्या संरक्षणाला पोलीस प्रशासनाचे प्राधान्य*
पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके म्हणाले, नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाचे प्राधान्य असून सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
*400 पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 10 हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, होमगार्ड व स्वयंसेवक कार्यरत असतील.
* 'ट्रॅफिक जॅम' ची समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
* सोशल मीडिया द्वारे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे.
*अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई*
पोलीस अधीक्षक संदिप पाटील म्हणाले, पेरणे जयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या भावनांचा आदर राखून शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांच्या वाहनांसाठी या परिसरापासून जवळच विविध ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 150 एक जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. हा कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी बाहेरुन येणारे व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. सोशल मिडियाव्दारे प्रक्षोभक वक्तव्य करणा-या तसेच खोटया अफवा व चुकीच्या पोस्ट प्रसारित करणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
000000