शाळेत तुटले विद्यार्थ्यांचे बोट, विद्यार्थ्याच्या पालकांपासून ठेवले लपवून, नेरळ येथील खाजगी शाळेतला प्रकार, शाळेचे नाव मोठं लक्षण खोटं, विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर
कर्जत दि.14 गणेश पवार
आपल्या मुलांनी इंग्रजी शिकून ते अस्खलित बोलावं यासाठी पालक त्यांना भरमसाठ फी भरून खाजगी शाळेत पाठवतात. मात्र खाजगी शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता अक्षरशः वाऱ्यावर सोडली असल्याने एका विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त झालं आहे. शाळेत दरवाज्यात अडकून बोट तुटले. परंतु हि बाब पालकांना न सांगताच त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. आपल्या मुलाच्या बोटातून एव्हडं रक्त का जात आहे हे न समजल्यामुळे मुलाच्या आईने दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन बोटाची पट्टी उघडली तर त्या आईला धक्काच बसला कारण तिच्या मुलाचं बोटाचा तुकडा पडला होता. हा प्रकार घडला आहे आहे नेरळमधील एका नाव मोठं असलेल्या शाळेत.
आजच्या आधुनिक युगात इंग्रजीचा वाढता प्रभाव साहजिकच आजच्या पालकांना प्रभावित करतो. त्यामुळे मुलांनी इंग्रजी शिकावं हा आजच्या पालकांचा होरा असतो. आपल्या मुलांना अस्खलित इंग्रजी बोलता यावे म्हणून खाजगी शाळांकडे पालकांचा वाढता कल दिसून येतो .त्यामुळे प्रसंगी काबाडकष्ट करून पालक आपल्या पाल्यासाठी भरमसाठ फी खाजगी शाळांमध्ये भरत असतात. मात्र एव्हडे करूनही खाजगी शिक्षण संस्था या केवळ फीच्या नावाखाली पैसे उकळून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा याकडे कानाडोळा करत असल्याचे समोर आले आहे. नेरळ येथील नामांकित हाजी मोहम्मद हनीफ शैक्षणिक संस्थेची हाजी लियाकत इंग्लिश हायस्कुल या शाळेत अशाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विराज ठक्कर हा १२ वर्षीय मुलगा या शाळेत ६ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. विराजचे वडील किरीट ठक्कर हे ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतात. तर विराजजी आई दिव्या ठक्कर हि सध्या गृहिणी आहे. दिनांक ६ डिसेंबर रोजी हाजी लियाकत शाळेत क्रीडा कार्यक्रम होते. यादरम्यान दुपारी १२ च्या सुमारास विराज हा वर्गखोलीच्या दरवाज्यात हात ठेऊन उभा असताना अचानक दरवाजा लागल्या गेला. तो फटका एवढा जोरात बसला कि त्यात विराजच्या डाव्या हाताच्या करंगळीच्या तुकडा पडला. वर्गखोलीच्या दरवाज्याला रोधक ( स्टॉपर) नसल्याने हि घटना घडली. वेदनेने विराजची किंकाळी बाहेर पडली. त्यामुळे शाळेतील शिक्षक काय झालं म्हणून धावले. हा प्रकार पाहून विराजला त्यांनी तात्काळ नेरळ येथील डॉ.महेश शिरसाट यांच्या दवाखान्यात नेले. या सगळ्यात शाळेच्या शिक्षकांचे जेवढे कर्तव्य हे प्रथमोपचार करणे होते त्याचबरोबर घडलेल्या घटनेची माहिती हि जखमी विद्यार्थ्याच्या पालकाला कळविणे हे हि होते. मात्र डॉ.शिरसाट यांच्याकडून प्रथमोपचार करून विराजला परत शाळेत नेण्यात आले. आणि त्यानंतर विराजला घेऊन शिक्षक हे त्याच्या घरी गेले व फक्त नख तुटलं आहे असं विराजची आई दिव्या यांना सांगितले. शिक्षक एवढे सांगत आहे म्हंटल्यावर विराजच्या आईने देखील जास्त काही झालं नाही असा विचार केला. परंतु संध्याकाळपर्यंत विराजच्या करंगळीची पट्टी रक्ताने भरली. तेव्हा काळजीने त्या आईच्या मनात चर्रर्र झाले. त्यामुळे शंका येऊन दिव्या ठक्कर यांनी विराजला दवाखान्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेरळ साई मंदिर परिसरातील डॉ.राठोड यांचे ओजस क्लिनिक येथे त्या गेल्या. डॉ.राठोड यांनी विराजची पट्टी उघडली तेव्हा दिव्या ठक्कर यांना धक्काच बसला. विराजच्या करंगळीचा वरच्या भागाचा तुकडा पडला होता. डॉ.राठोड यांनी देखील विराजची जखम पाहून तात्काळ पुढे हलवण्याचा सल्ला दिला. विराजच्या वडिलांना बोलावून घेऊन ठक्कर दाम्पत्यांनी ठाणे येथील नोबेल हॉस्पिटल गाठले. तेथे विराजवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
तुकडामात्र एवढा मोठा अपघात शाळेच्या आवारात होऊन देखील त्याची कल्पना शाळेच्या शिक्षकांनी व प्रशासनाने न दिल्याने ठक्कर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विराजच्या तुटलेल्या करंगळीचा तुकडा मिळाला असता तर तो पुन्हा जोडला गेला असता मात्र शाळा प्रशासनाने तो न दिल्याने तसेच तो तुकडा कुठे गेला हे देखील माहित नाही असे उत्तर ठक्कर कुटुंबियांना शाळा प्रशासनाने देण्याचा प्रताप केला आहे. तेव्हा भरमसाठ फी आकारूनही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रॅम भरोसे सोडणाऱ्या अश्या मुजोर हाजी लियाकत इंग्लिश शाळेवर कारवाईचा आसूड शिक्षण विभाग ओढणार का असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे.
चौकट
आम्ही शाळेतील विद्याथ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. मात्र विराजचा अपघात घडला तेव्हा तेथील वर्गखोलीच्या दरवाज्याचा रोधक ( स्टॉपर) खालील फरशी निखळली होती. त्यामुळे दरवाजा जोरात लागला गेला असेल. त्याच नख निघालं असेल म्हणून आम्ही प्रथोमचार करून त्याला घरी सोडले. त्यात आमची काही चूक नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली त्याला आपण काय करू शकतो.
:- अब्दुल सैयद, संचालक, हाजी लियाकत हायस्कुल नेरळ ,
माझ्याकडे साधारण दुपारी १२ ते १२.३० च्या हाजी लियाकत शाळेतील शिक्षक विराज या विद्यार्थ्याला घेऊन आले होते. त्याच्या करंगळीच्या बोटावरचा एक भाग तुटला होता. त्यामुळे मी माझ्याकडून प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या असे प्रिस्क्रिप्शनवर लिहून देखील दिले होते. मात्र त्याला माझ्याकडे आणताना फर्स्ट एड सुद्धा केले गेले नव्हते.
:- डॉ.महेश शिरसाट, नेरळ
माझ्या मुलाच्या तुटलेल्या करंगळीचा भाग आम्हाला मिळाला असता तर कदाचित त्याचे बोट पूर्ववत झाले असते. पण त्याच्या बोटाला एव्हढी मोठी इजा झाली आहे. हे सुद्धा शाळेतून घरी सोडायला आलेल्या शिक्षकांनी सांगण्याची तसदी घेतली नाही. तर शाळेतून डॉक्टरांकडे उपचाराला नेताना मला सांगण्याची सुद्धा गरज हाजी लियाकत शाळा प्रशासनाला का वाटू नये ? आम्ही वेळेवर फी भरतो त्याची हि पोहचपावती आहे का ? जर मी दुसऱ्या डॉक्टरांकडे मुलाला घेऊन तात्काळ उपचार केला नसता तर जंतुसंसर्ग होऊन माझ्या मुलाचा हात निकामी झाला असता मग जबाबदारी शाळेने घेतली असती का ? या शाळेवर कारवाई हि झालीच पाहिजे न्यायासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ
:- दिव्या ठक्कर, पीडित मुलाची आई
खाजगी शाळा या भरमसाठ फी आकारणी करून मुलांना शिक्षण देत असतात. तेव्हा शाळेत मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी हि त्यांचीच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाय योजना त्यांनी करणे क्रमप्राप्त आहे. या घटनेत पहिल्यादा मुलाला दवाखान्यात नेताना शाळा प्रशासनाने जखमी मुलाच्या पालकांना सांगणे गरजेचे होते. दुसरी गोष्ट हि घटना शाळेत घडली आहे. तेव्हा त्या मुलाच्या औषधोपचाराचा भर शाळेनेच उचलायला हवा होता मात्र शाळा प्रशासनाने हि बाब लपवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
अशोक जंगले, संचालक चाईल्डलाईन
फोटो ओळ
हाजी लियाकत शाळा, पीडित विराज ठक्कर, जखमी झालेले त्याचे बोट
छाया : गणेश पवार