*फर्ग्युसन कॉलेजचा इतिहास नक्की वाचा* ● *कोणकोण शिकले याचा गौरवपुर्ण उल्लेख करतात,पण खऱ्या अर्थाने ही वास्तु वारसा ठरण्यामागे मोलाचा वाटा असणाऱ्या राजाराम शिरोळे पाटील व छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचा सर्वांना विसर पडला आहे*

२ जानेवारी १८८५ 
पुण्याचा मानबिंदू असणार्या फर्ग्युसन कॉलेजचा वर्धापन दिवस 


फर्ग्युसन कॉलेजचा इतिहास नक्की वाचा ●


पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठ अनुदान आयोगाचा (युजीसी) वारसा दर्जा प्राप्त झाल्याची बातमी ६ जुलै च्या टाईम्स ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रातुन वाचनात आली.या दर्जाद्वारे आता संस्थेला केंद्र सरकारकडुन ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.संस्थेच्या यशाबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.यानिमित्ताने संस्थेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अनेकांचा गौरव वर्तमानपत्रे,दुरदर्शनवर होताना दिसत आहे.तो व्हायलाच हवा.पण हे होत असतानाच इतिहासामध्ये संस्थेच्या उभारणीसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा काही प्रमुख व्यक्तींचाही उल्लेख यानिमित्ताने होणे अपेक्षित होते.मात्र तसा उल्लेख कुठेच होताना दिसत नाही याचे शल्य मनाला बोचत होते.किंबहुना त्या प्रमुख व्यक्तींचा उल्लेख केला नाही तर संस्थेचा इतिहास पुर्णच होऊ शकत नाही.याच पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेजच्या जमीनीचे विद्यमान सातबाराधारक मालक असणाऱ्या मा.मालोजीराजे शिरोळे,पुणे (मोबाईल क्रमांक 9881819205) यांच्या इतिहासप्रेमी प्रशांत धुमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचे सविस्तर वृत्त.
दि.७ जुलै २०१५)


फर्ग्युसन कॉलेज आज ज्या जागेवर उभे आहे,ती मुळची जमीन नारोजी सुलतानजी शिरोळे यांच्या मालकीची होती.नारोजींना राजाराम नावाचा मुलगा होता.या राजारामांना रामराव,भगवानराव व गणपतराव नावाची तीन मुले होती.शिरोळे हे शिवरायांच्या काळापासुन ऐतिहासिक महत्व असणारे ताकदवान मराठा घराणे होते.भांबुर्ड्याची (आजचे शिवाजीनगर) पाटीलकी त्यांच्याकडे होती.या भागातील बरीच जमीन त्यांच्याकडे होती.नारोजींच्या मृत्युनंतर जमीनीची मालकी त्यांचे पुत्र राजाराम शिरोळे यांच्याकडे आली.
नेमक्या त्याच काळात पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचार चालु केला होता.दुसरीकडे गोपाळ आगरकांनी बाळ टिळकांच्या जोडीने शिक्षणक्षेत्रात काम चालु केले होते.परंतु जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या. शिवाजीनगर गावठाण परिसरात शिरोळेंच्या मालकीची बरीचशी जमीन असल्याचे आगरकरांना ज्ञात होते.परंतु शिरोळे पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यास आगरकर व टिळक धजत नव्हते.शेवटी अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आगरकरांनीच १८७५-७७ च्या दरम्यान राजाराम शिरोळे पाटलांशी संपर्क साधुन त्यांना भेटायला गेले.या भेटीत त्यांनी शिरोळे पाटलांकडे शिक्षणसंस्थेसाठी जमीन विकत द्यावी अशी मागणी केली.परंतु शिरोळे पाटील हे मराठा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी जमीन विकत देण्यास नकार दिला.हवी तर भाड्याने देऊ शकतो अशी सुचना केली.पण टिळकांनी जमीन विकतच हवी असा अट्टाहास धरल्यामुळे शिरोळे पाटलांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आणि पुढची सर्व बोलणी ठप्प झाली.यानंतर महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती शिरोळेंना या प्रश्नावर विनंती करायला पुढे येत नव्हता.आगरकरांची अडचण अजुनच वाढली.
त्यावेळी कोल्हापुर संस्थानातुन राज्यकारभार करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे आगरकरांचा त्यांच्याशी संपर्क आला.टिळकांनी डाव साधुन आगरकरांना शाहु महाराजांकडे जाण्याचा सल्ला दिला व त्यांच्या कानावर हे प्रकरण घातले.शाहु महाराज स्वतः शिक्षणप्रेमी होते.त्यानंतर स्वतः ते १८८० मध्ये पुण्यात राजाराम शिरोळे पाटलांकडे आले.एवढा मोठा राजा आपल्या घरी आल्याचे पाहुन शिरोळे पाटलांना गहिवरुन आले.महाराजांनी आज्ञा करावी असा आश्वासक सुर शिरोळे पाटलांच्या बोलण्यातुन व्यक्त झाला.यावर शाहु महाराजांनी त्यांना विनंती केली की,आगरकरांना शैक्षणिक कार्यासाठी तुमची काही जमीन द्यावी.शिरोळे पाटील बोलले की,मी इथली जमीन कसतो,अनेक सर्वसामान्य लोक त्यावर उपजिवीका करतात.परंतु तुमचा मान म्हणुन मी या शैक्षणिक कार्यासाठी माझी जमीन द्यायला तयार आहे.तेव्हा छत्रपती शाहु महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानुन राजाराम शिरोळे पाटील व त्यांच्या तीन मुलांनी १८८० साली बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी नाममात्र दराने ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर मुठा नदीच्या पश्चिमेला असलेली आपली ३७.५ एकर जमीन 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' ला देण्याच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.आजही भारतात शैक्षणिक कार्यासाठी एवढी जागा देणारे एकही उदाहरण सापडत नाही.
आता जागेचा प्रश्न संपला होता.परंतु काम करण्यासाठी पैशांची चणचण जाणवु लागली.त्यामुळे पुन्हा एकदा आगरकर-टिळक जोडीने छत्रपती शाहु महाराजांना साकडे घातले.त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता शाहु महाराजांनी ५००० रुपयांची मदत देऊन काम सुरु करण्यास सांगितले.एवढेच नाही तर संपुर्ण खर्चाची जबाबदारी उचलण्याची खात्री दिली.एवढे करुन शाहु महाराज थांबले नाहीत,तर तत्कालीन गव्हर्नर फेड्रिक याच्याशी संपर्क साधुन महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता द्यावी अशी विनंती लावुन धरली.
शाहु महाराजांच्या चिकाटीमुळे महाविद्यालयासाठी परवानगी मिळाली.त्यानंतर तत्कालीन इंग्रज अधिकारी फर्ग्युसन याच्या हस्ते इमारतीचा शिलान्यास करण्यात आला.त्याच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात.पुर्वी या महाविद्यालयाच्या जागी असणाऱ्या शिरोळे पाटलांच्या शेतीतुन वाहणारा पाण्याचा पाट आजही पहायला मिळतो.तसेच ऐतिहासिक एमपी थिएटरजवळ असणाऱ्या विहीरीमुळे भांबुर्ड्यातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता.आजही त्या ऐतिहासिक विहीरीचे दगड पहायला मिळतात.
पुढे राजाराम शिरोळे पाटलांचे वंशज बाबुराव गणपतराव शिरोळे पाटील यांनी या महाविद्यालयात झुलॉजी (प्राणीशास्त्र) विभागामध्ये विभागप्रमुख म्हणुन काम पाहिले.पुढे सेवाज्येष्ठतेनुसार या महाविद्यालयाचे प्राचार्य तेच होणार होते,परंतु जुजबी कारण दाखवुन त्यांची ही संधी हिरावुन घेण्यात आली.राजाराम शिरोळे पाटलांचे नंतरचे एक वंशज मालोजीराजे शिरोळे पाटील यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले.या महाविद्यालयासाठी छत्रपती शाहु महाराज व आपल्या पुर्वजांनी दिलेल्या योगदानाची त्यांना पुर्ण माहिती होती.त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत १९५८ मध्ये नेमका एक किस्सा घडला.ज्या छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला, त्याच शाहु महाराजांचा महाविद्यालयामध्ये लावलेला फोटो काही नतद्रष्ट लोकांनी काढुन टाकला.ही गोष्ट मालोजीराजेंना समजली तेव्हा त्यांनी या कृत्याचा निषेध करुन ठाम पावले उचलली. मालोजीराजे शिरोळे,माजी मंत्री मधुकरजी पिचड,पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नानासाहेब शितोळे, पालांडे व गावठाणातील तत्कालीन मराठा-बहुजन व मुस्लिम मंडळींच्या साथीने तत्कालीन प्राचार्यांच्या विरोधात आंदोलन केले.दोन वर्षांनंतर १९६० मध्ये प्राचार्यांनी या आंदोलनासमोर शरणागती पत्करली आणि इमारतीच्या रंगरंगोटीसाठी सदर फोटो काढला होता असे जुजबी कारण देऊन तो फोटो परत लावला.या ऐतिहासिक प्रसंगांची आठवण ताजी करताना आजही ७८ वर्ष वय असणाऱ्या मालोजीराजे शिरोळेंना गहिवरुन येते.


सदर लेखनप्रपंच करण्यामागचे कारण असे की,आज २०१५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयास वारसा दर्जा मिळाला असताना सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया या महाविद्यालयात कोणकोण शिकले याचा गौरवपुर्ण उल्लेख करतात,पण खऱ्या अर्थाने ही वास्तु वारसा ठरण्यामागे मोलाचा वाटा असणाऱ्या राजाराम शिरोळे पाटील व छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचा सर्वांना विसर पडला आहे.ज्या व्यक्ती आपला इतिहास विसरतात त्या व्यक्ती आपला इतिहास घडवु शकत नाहीत.