*पंढरपूरच्या तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांचा वाळु माफियांना दणका! होडीतून प्रवास करत जप्त केली 70 ब्रास वाळु... 5 लाखाचा मुद्देमाल*
⭕सोलापुरः मुजोर झालेल्या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी आता तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दमदारपणे पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. कारण आंबे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर होडीतून पैलतिरावर जात खरसोळी येथील वाळू साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी चळे व पुळूज मंडलमधील मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे संयुक्त पथक तयार करून गुरूवारी सकाळी आंबे व खरसोळी परिसरात धाड टाकली. तेंव्हा भीमा नदीपात्रा लगत असलेल्या शेतकर्यांच्या अनेक शेतांमध्ये अवैध वाळूचे मोठमोठे ढिगारे असल्याचे दिसून आले.
यानंतर पैलतिरावरील खरसोळी भागातही अवैध वाळू साठे असल्याचे लक्षात येताच तात्काळ तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी होडीतून प्रवास करित पैलतिरावर जाऊन वाळू साठ्यावर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान या पथकासोबत कोणतेही पोलीस संरक्षण नव्हते. त्यामुळे तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या सर्व पथकाचे आंबे, खरसोळी परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. कारण येथे एखादे शासकीय वाहन अथवा कर्मचारी नजरेस पडला तर लगेच वाळू माफिया त्यांना गराडा घालून अरेरावी करून हुसकावून लावत असल्याचे प्रकार या अगोदर अनेकदा याभागात घडले आहेत. जप्त केलेला वाळू साठा शासकीय धान्य गोदामामध्ये आणण्यात आला. सुमारे चार तास चाललेल्या या कारवाईमध्ये चळे मंडल अधिकारी संतोष सुरवसे, पुळूज मंडल अधिकारी गणेश टिके, तलाठी बी.ए.गोरे, सखाराम डोरले, ए.बी.काळेल, पी.टी.गुजले, कोतवाल महादेव बंडगर, गणेश कांबळे, महादेव खिलारे, माणिक खंदारे यांचा समावेश होता. तहसिलार डॉ. वैशाली वाघमारे यांनी धाडसी कारवाई करत पहिल्याच दणक्यात जवळपास 70 ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला असल्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून ग्रामस्थांमधून मात्र तहसिल प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
पंढरपूरच्या तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांचा वाळु माफियांना दणका! होडीतून प्रवास करत जप्त केली 70 ब्रास वाळु... 5 लाखाचा मुद्देमाल