मुख्यमंत्र्यांनी तात्काळ साईबाबा जन्मभुमीचे विधान मागे घ्यावे, विखे पाटलांचं उद्धव ठाकरेंना आवाहन __________________________________

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ साईबाबा जन्मभुमीचे विधान मागे घ्यावे, विखे पाटलांचं उद्धव ठाकरेंना आवाहन
__________________________________


साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढत असून शिर्डीने रविवारपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये पंचक्रोशीतील अनेक गावे सहभागी होत आहेत. या बंद काळात साईमंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून प्रसादालयही सुरू राहणार आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साईबाबांचे दर्शन घेत बंद न पाळण्याचे आवाहन शिर्डीकरांना केले. तर, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरेंनी आपले विधान मागे घ्यावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. 
भाजपा नेते आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. जन्मस्थळाच्या वादावर बोलताना, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. शिर्डीच्या जन्मस्थळाच्या वादावर अर्थकारण जोडलंय हे केलेले आरोप योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपले विधान मागे घ्यावे, असेही पाटील यांनी म्हटलं आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सार्इंच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल, अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डी व भाविकांमध्ये उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही, मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे़ जन्मस्थळाच्या वादामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व प्रतिमेलाच धक्का पोहचणार असल्याने शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.
दरम्यान, रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून बेमुदत बंद संदर्भात पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनीही शिर्डीकरांबरोबर बैठक घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले़ या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, शिवाजी गोंदकर, नितीन कोते आदी उपस्थित होते़ राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोऱ्हाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह अनेक गावे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी ग्रामसभा होत असून तत्पूर्वी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे बैठक घेणार आहेत.
साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणी कितीही दावे-प्रतिदावे केले तरी साईभक्तांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख का केला माहिती नाही़ ते जन्मस्थळाच्या नामोल्लेखाच्या वादावर नक्कीच तोडगा काढतील.