E M I - किती असावा?????
आज अतिशय महत्वाच्या अशा मुद्यावर आपण माहिती घेणार आहोत, तो म्हणजे EMI किती असावा? खरेतर EMI किती असावा याचा काही नियम नाही. तुम्ही कितीपण EMI घेऊ शकता परंतू, खरच आपण त्याला काहीतरी मापदंड लावायलाच पाहिजे, नाही तर पगार कमी आणि EMI जास्त होतो. EMI ची एकदा सवय लागली की मग आपण त्या ट्रॅप मध्ये अडकत जातो आणि बाहेर पड़णे खूप अवघड होऊन जाते.
मी मागच्याच महिन्यात अनुभवलेला एक EMI चा ट्रॅप. त्या ट्रॅप मध्ये अड्कलेल्या एका फॅमिलीचा EMI किती होता ते बघू…
मला गेल्या महिन्यात माझे एक गुंतवणूकदार जे पुण्यामध्ये असतात त्यांचा फ़ोन आला, त्यांच्या मित्रालाही आर्थिक नियोजन करायचे होते. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे गेलो. थोड्या गप्पा झाल्या, मी त्यांच्या लाइफस्टाइल, फ्लॅट, घरातील महागड़े फर्निचर आणि इतर गोष्टी बघून खूपच इम्प्रेस झालो, खूपच सुंदर घर होते ते. मग म्हटले आता आर्थिक नियोजन करण्याच्या कामाला सुरुवात करू या. मी त्यांची वैयक्तिक माहिती घ्यायला सुरुवात केली, जसे की वय, जॉब कुठे करतात, फॅमिली मध्ये कोण कोण असतात, पॅकेज किती(पगार). इथपर्यंत काहीच प्रॉब्लम वाटला नाही. पण जेव्हा मी कॅशफ्लो स्टेटमेंट तयार करण्यासाठी खर्च अणि EMI बद्दल विचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा खूप मोठा धक्काच बसला मला. तुम्ही बघा तुम्हालाही बसेल…
पगार : पती - 85000, पत्नी 65000 (दोघांचा मिळून 150000 ( काहीच वाईट नाही खुप चांगला पगार आहे)
EMI : होम लोन - 80000 ( 1. 25 CR चा फ्लॅट)
कार EMI : 25000 ( 18 लाखाची )
पर्सनल लोन EMI : 12000 (वार्षिक फॅमिली ट्रिपसाठी पर्सनल लोन घेतले होते)
क्रेडिट कार्ड EMI : 5000 ( ट्रिप साठी खरेदी )
आठवड्याचा खर्च : 5000 ( शनिवार/रविवार सुट्टी असते कार घेऊन कुठे तरी बाहेर)
इन्शुरन्स : 5000 दरमहा प्रीमियम (ULIP पॉलिसी 500000 लाइफ कव्हर )
मेडिक्लेम : नाही ( कंपनी ने दिलेला आहे )
आता आपण खर्चाची TOTAL करू या ,
80000 +25000 +12000 +5000 +20000 (आठवड्याचा खर्च 5000)+5000 =147000 ,( या मध्ये महिन्याचा किराणा + TAX + औषधे इतर खर्च पकडलेला नाही ) याला म्हणतात परफेक्ट EMI ट्रॅप,
मी जेव्हा विचारले की पगारामधून पैसे तर काहीच उरत नाही मग खर्च कसा चालतो त्यांचे प्रामाणिक उत्तर - क्रेडिट कार्ड आहे ना. ते पुढे म्हणाले की आता या सगळ्या EMI ची भीती वाटायला लागली म्हणूनच तुम्हाला बोलावले आहे. (या सगळ्या EMI मुळे वय 35 झाले तरी अजुन बाळासाठी प्लानिंग केले नाही कारण एकाला जॉब सोडावा लागेल आणि एकाच्या उत्पन्नावर घर चालणार नाही)
एकदा तुम्हाला क्रेडिट कार्ड अणि EMI ची सवय लागली की तुम्ही स्वत:साठी कधीच संपत्ती तयार करू शकत नाही, कारण आपण क्रेडिट कार्ड अणि EMI साठीच काम करत राहतो. वरील फॅमिली साठी मी पुढे आर्थिक नियोजन तयार करुण दिले.
आपण या मधून काहीतरी शिकायला हवे म्हणून हा अनुभव इथे दिला आहे.
१) कोणाचे घर खूप मोठे अणि सुंदर आहे याचा अर्थ ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे असा होत नाही (कदाचित सगळे EMI वर घेतले असेल व त्या EMI च्या टेंशन मुळे रात्रीची झोप ही शांत लगत नसेल).
२) कार किती मोठी आहे यापेक्षा तिने तुमचे किती पैसे खर्च केले हे अधिक महत्वाचे आहे.
३) पर्सनल लोन घेऊन कधीही ट्रिप करू नका.
४) क्रेडिट कार्ड म्हणजे उद्या येणारा पैसा आजच खर्च करणे (क्रेडिट कार्ड चे व्याज जगात सर्वात जास्त असते २५% ते ४४%).
५) शनिवार /रविवार सुट्टी असते याचा अर्थ दरवेळी खर्च करुन बाहेरच जावे असे नाही.
६) विमा पॉलिसी साठी आपण किती प्रीमियम भरतो यापेक्षा ती पॉलिसी आपल्याला किती विमा सरक्षण देते ते महत्वाचे.
पगार अणि खर्च यांचा ताळेबंद जर योग्य पद्धतीने मांडता नाही आला तर कर्ज बाज़ारी होण्याची वेळ येते.
घाई करणे - बऱ्याच वेळा घर घेण्याची, कार घेण्याची खूप घाई केली जाते, त्या वस्तू घेताना खूप घाई न करता आपला पगार किती, आपल्याला त्या गोष्टीची गरज किती, या गोष्टी आपल्याला समाधान देणाऱ्या असल्या पाहिजे, उगाचच कोणी मित्राने किवा नातेवाईक ने घेतली म्हणून मी कार किंवा घर घेतो असे करू नये.