हिंदू धर्म हा वाळवंटातील कणाला तृप्त करण्यासारखा आहे राहुल सोलापूरकर यांचे विचारः एमआयटीत ज्ञानजागर कार्यक्रम संपन्न स्वामी विवेकानंदांची जयंती व युवादिन साजरा

कृपया प्रसिध्दीसाठी                 दि. 12 जानेवारी 2020

हिंदू धर्म हा वाळवंटातील कणाला तृप्त करण्यासारखा आहे
राहुल सोलापूरकर यांचे विचारः एमआयटीत ज्ञानजागर कार्यक्रम संपन्न
स्वामी विवेकानंदांची जयंती व युवादिन साजरा
 
पुणे, दि. 12 जानेवारी: “ हिंदू धर्म हा असा पाण्याच्या थेंबासारखा आहे ,जो वाळवंटातील रखरखत्या कणावर पडून त्याला तृप्त करतो. मानवता, विश्वशांती व विश्वबंधुत्वचा स्वामीजींचा हाच नारा घेऊन आम्हाला आता जगभर पोहचायचे आहेे. स्वामीजींनी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचा विचार संपूर्ण जगाला दिला आहे. या तत्वावर सर्वांनी चालल्यास भारत विश्वगुरू बनेल,” असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते, वक्ते व मार्गदर्शक राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या जन्मदिनाचे व युवादिनाचे औचित्य साधून भारतीय अस्मिता जागविण्यासाठी “ ज्ञानजागर” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व बेल्लूर मठाचे डॉ.बी.पी. चॅटर्जी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी आर्ट, डिझाइन, टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे आणि प्रा. डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
 राहुल सोलापूरकर म्हणाले,“ 1893 ला स्वामी विवेकानंद शिकागोला जागतिक परिषदेत गेले असतांना तेथील औद्योगिक प्रदर्शन पाहिले. त्यावेळेस प्रो. जॉन हेणरी यांनी त्यांच्या चर्चेतील सर्व नोंदी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजींचे सर्व विचार हे विज्ञान आणि मानवतावादी दृष्टीकोनातील होते. त्यावर आधारित प्रा. टेल्सा यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर आइनस्टाइन यांनी सूत्र मांडले. या सूत्राच्या मुळाशी स्वामी विवेकांनद यांचे विचार दिसून येतात.”
“संपूर्ण जगभर भारतीय तत्वज्ञान पोहचविण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. तसेच, लोकशिक्षणासाठी व भारतमातेचे दर्शन घेण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करीत असतांना त्यांची चर्चा एक व्यक्ती बरोबर झाली. ही चर्चा ऐवढी रंगात आली की पुणे शहर कधी आले हे कळलेच नाही. तेव्हा, त्या व्यक्तीने त्यांचा पुण्यात सत्कार केला. ती व्यक्ती म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे होते.
“त्यानंतर मिरज येथे गेल्यावर तेथे एक ग्रंथालयात चार दिवस त्यांनी अध्ययन केले. त्यावेळेस तेथील ग्रंथपाल यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवले की  रेजर शॉर्प व फोटोशॉपी मेमरी हे ऐकले होते आज ते प्रत्यक्षात पाहिले. त्यांनी गोव्यात ख्रिस्तीधर्माचा ही अभ्यास केला.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ स्वामीजींनी वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन सर्व जगाला घडवून दिले होते. द स्पेक विवेकानंदा या पुस्तकाने माझ्या जीवनात बदल घडून आला. त्यांना अधिष्ठान ठेऊन मी संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहे. स्वामींजींचा विचार तरूण पिढीमध्ये रूजविण्याचा आम्ही अल्पसा प्रयत्न करीत आहोत. स्वामी विवेकानंदांनी भाकीत केल्याप्रमाणे 21 व्या शतकात आपली भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येईल व संपूर्ण जगाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखवेल. त्यामध्ये युवकांचे योगदान मोलाचे असाणार आहे.”
यावेळी विद्यार्थीनी शिवानी बिर्दावडे, दिव्या गुगळे, विद्यार्थी अभिषेक उपाध्याय, नेमिश लखेवार, ऋत्विक शिनकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमुळे युवकांना कशी प्रेरणा मिळते. युवकांचा हा देश विश्वगुरू कसा बनेल यावर विचार व्यक्त केले.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्तावना मांडली.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले


जनसंपर्क विभाग,
 माईर्स एमआयटी, पुणे


फोटोः क्र. 6130
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या जन्मदिनाचे व युवादिनाचे औचित्य साधून भारतीय अस्मिता जागविण्यासाठी “ ज्ञानजागर” या कार्यक्रमप्रसंगी डावीकडून डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ.बी.पी. चॅटर्जी, डॉ. विश्वनाथ दा. कराड, राहुल सोलापूरकर, डॉ. मंगेश तु. कराड व प्रा.डी.पी. आपटे.