*पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी*
*खासदार गिरीश बापट यांचे आवाहन*
◆ *पुणे श्रमिक पत्रकार संघ व पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा*
◆ *ज्येष्ठ पत्रकार मा.कृ. पारधी व रामभाऊ जोशी यांचा विशेष सन्मान*
पुणे,दि.६: समाजात पत्रकारांना अनन्यसाधारण स्थान असून पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त आज पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने व खासदार गिरीश बापट यांच्या सहकार्याने त्यांच्या हस्ते आज ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मा. कृ. पारधी व रामभाऊ जोशी यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, विश्वस्त, कार्यवाह विठ्ठल जाधव, माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
खासदार श्री. बापट म्हणाले, पत्रकार समाजसेवेचे काम करतात. निवृत्त पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाबरोबरच कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनीही पुढे यायला हवे. मराठी पत्रकार दिनाचा सोहळा पत्रकारांचा स्नेहसोहळा बनावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, पत्रकारांच्या या सन्मान कार्यक्रमासाठी ज्येष्ठ व निवृत्त पत्रकारांना आवर्जुन निमंत्रित करावे, जेणेकरुन या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांच्या अडी-अडचणींवर चर्चा होवून त्या सोडवता येतील. समाजाने पत्रकारितेकडे व पत्रकारांकडे कौटुंबिक भावनेतून बघायला हवे. पत्रकारांनी पत्रकारितेची उंची आपल्या कार्यातून इतकी वाढवावी, की समाजातील कोणताही ही घटक पत्रकारांना गृहीत धरणार नाही. पत्रकारांनीही आपल्या कृतीतून दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
यावेळी माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी सादरीकरणातून राज्य शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका, पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आदींची माहिती त्यांनी दिली. तसेच या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार मा.कृ.पारधी म्हणाले, श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने हा दुसऱ्यांदा सन्मान होत असून हा माझ्यासाठी मोलाचा क्षण आहे. ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी म्हणाले, पत्रकारांनी पत्रकारांचा सन्मान करण्याची ही मोठी बाब असून हा उपक्रम पुण्यात पत्रकार संघाने सुरु केला हे आनंददायी आहे. आजवर अनेक ठिकाणी सत्कार होवून पुरस्कार मिळाले, परंतु आजचा सन्मान हा माझ्यासाठी मोलाचा व घरातून झालेला सन्मान आहे. पत्रकारितेत काम करताना अनेक मोठमोठ्या व नामांकित व्यक्तींच्या ओळखी झाल्या. याचा उपयोग अनेकांच्या समस्या सोडविण्यासाठी करुन घेतला, असे सांगून पत्रकारितेमुळे जीवन समृध्द झाले, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अंकुश काकडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, सुनिल माने आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविकातून संघाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आभार पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे विश्वस्त, कार्यवाह विठ्ठल जाधव यांनी मानले. सुत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुकृत मोकाशे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रिकर, वसंतराव गाडगीळ, किरण ठाकूर, आनंद आगाशे, राजीव साबडे, यमाजी मालकर, अनिल टाकळकर, अविनाश भट, विनिता देशमुख, गौरी आठल्ये, राजीव साबडे, विकास वाळुंजकर, गोविंद देशपांडे आदि मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000