पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी देणार : मुख्यमंत्री ठाकरे

पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी देणार : मुख्यमंत्री ठाकरे
_________________________________


परभणी जिल्ह्यातील पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून शासन निधी देईल. साईबाबांचे  जन्मस्थळ आहे म्हणून हा निधी दिला जाणार नाही. त्या वादात शासनाला पडायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे शिर्डीकरांचे समाधान झाले आहे. 
साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा केला जात असलेल्या पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. त्यावरुन वाद उद्भवला आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळच नाही, असा आक्षेप शिर्डीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. 
पाथरीला तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी देण्यास शिर्डीकरांची हरकत आहे का? असा मुद्दा बैठकीत ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर शिर्डीतील ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र योजनेतून गावाला निधी द्या. पण साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून निधी देण्यास आमची हरकत असल्याचे नमूद केले. त्यावर शासन हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख करणार नाही. त्या वादात आम्हाला पडायचे नाही. मात्र तीर्थक्षेत्र म्हणून या गावाला निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर समाधान झाल्याने शिर्डीतील बंद ग्रामस्थांनी कायमस्वरुपी मागे घेतला आहे. 
मी जनतेची गार्हाणी ऐकायला बसलो आहे. शिर्डीकरांनी माझ्याशी चर्चा करण्यापूर्वी बंद करायला नको होता अशा भावनाही ठाकरे यांनी व्यक्त केल्या. 
साईबाबांना जात, धर्म नाही असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ व त्यांचे वंशज शोधणे योग्य नाही, अशी भूमिका यावेळी थोरात व विखे यांनी मांडली. बैठकीला शिर्डीतून कमलाकर कोते, कैलास कोते, ‘शिर्डी गॅझेटिअर’ या पुस्तकाचे लेखक व ‘लोकमत’चे शिर्डी प्रतिनिधी प्रमोद आहेर, राजेंद्र गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, मंगेश त्रिभूवन, डॉ. एकनाथ गोंदकर, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांची उपस्थिती होती.