एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या; परिसरात पसरली शोककळा
____________________________________
प्रयागराज येथील युसूफपूर गावात ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुले कान्हा (6) आणि कुंज (3) हे होते. शनिवारी रिक्षाचालक असलेला सोनू घरी आला. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची खळगी भरतो. नेहमी सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र, रविवारी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी मुन्नी देवी या तिवारी यांच्या घरी गेल्या. त्या महिलेने दरवाजा उघडताच तिच्यासमोर पाच मृतदेह पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक दृश्य पाहताच तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. स्थानिकांनी पोलिसांनी माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत.पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले, त्यावेळी दुसऱ्या खोलीत कामिनी आणि तिच्या लहान मुलाचा मृतदेह मिळाला. त्यानंतर आतल्या खोलीत विजय शंकर तिवारी यांचीही हत्या करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंबाचा अत्यंत निर्दयीपणे अंत करण्यात आला. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मात्र, मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तिवारी कुटुंबातील पाच जणांची हत्या कोणी केली, याबाबतची अद्याप छडा लागलेला नाही.