इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा
__________________________________
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दादरच्या इंदू मिल येथे भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.डॉ. बाबासाहेबांसारख्या महामानवाचे स्मारक हे भव्यदिव्य तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल, त्याचा नेटकेपणा, पावित्र्य राखले जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अजित पवार यांनी राज्यातील विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवातकेली. त्यासंदर्भात त्यांनी आज इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकस्थळाला भेट दिली. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी स्मारकाची सद्यस्थिती व आराखड्यासंदर्भात माहिती घेतली. स्मारकाच्या कामातील बारकावेही समजून घेतले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. स्मारकाचे दरवाजे हे उंच असले पाहिजेत. स्मारकाचा नेटकेपणा जपला गेला पाहिजे. स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या पायांना चटके बसू नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी आतापासूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यावा. समुद्राच्या खाऱ्या हवेचा स्मारकावर दुष्परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या. यावेळी मंत्री नवाब मलिक, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, रिपब्लिकन नेते सचिनखरात, स्मारकाचे वास्तूविशारद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.