तान्हाजी’प्रमाणे ‘छपाक’ करमुक्त

 


*‘छपाक’ला करमुक्ती नाही*
*दीपिका महत्त्वाची की अ‍ॅसिडहल्ला?*
महाराष्ट्र शासनाने ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही राज्यांनी ‘तान्हाजी’ करमुक्त केला आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. आपल्या योद्ध्यांच्या शौर्यकथा जनमानसापर्यंत पोहचल्याच पाहिजेत. पण ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याचा विचार हा दीपिका पदुकोण जेएनयूच्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी गेली त्यानंतरचा आहे. दीपिकाच्या या भेटीपूर्वी कोणत्याही सरकारचे ‘तान्हाजी’वर प्रेम उफाळून आले नव्हते. दीपिका जेएनयू विद्यापीठात गेली आणि ‘तान्हाजी’विरुद्ध दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला ‘छपाक’ असा वाद सुरू झाला. या वादाचा फायदा तान्हाजी चित्रपटाला करमुक्ती मिळून झाला. पण त्याच वेळी ‘छपाक’ चित्रपटाला या वादाचे दुष्परिणाम काही कारण नसताना भोगावे लागत आहेत. ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त होणे योग्यच आहे, पण मग ‘छपाक’ चित्रपट करमुक्त का केला जात नाही? तरुणींवर होणारे अ‍ॅसिडहल्ले आणि त्यातूनच अ‍ॅसिडविक्रीवर बंदीची मागणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय या चित्रपटात मेघना गुलझार यांनी समर्थपणे हाताळला आहे. अ‍ॅसिडहल्ला हा विषय महत्त्वाचा नाही का? या प्रकाराची मानवी आणि कायदेशीर बाजू पूर्ण समतोल राखत एखाद्या चित्रपटातून कथन केली असेल तर तो चित्रपट शाळा, कॉलेजमध्ये दाखविला गेला पाहिजे. परंतु सरकार असे कष्ट घेणार नसेल तर निदान हा चित्रपट करमुक्त केला पाहिजे.
मात्र या चित्रपटाची नायिका दीपिका पदुकोण आहे आणि दीपिका पदुकोण जेएनयूत गेली. यामुळे या चित्रपटाला करमुक्ती द्यायची नाही हा विचार बालिशपणाचा आहे.


             महाराष्ट्र सरकार ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करणार आहे, पण ‘छपाक’ करमुक्त केला तर दीपिकामुळे राजकारण पेटेल म्हणून हा चित्रपट करमुक्त करण्याचे धाडस महाराष्ट्रसरकार करीत नाही ही दुर्दैवी स्थिती आहे. अलीकडे म्हणजे 2019 च्या डिसेंबर महिन्यात गोंदिया जिल्ह्यात इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या 20 वर्षांच्या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला झाला. त्याच महिन्यात मुंबईत विक्रोळी भागात एका 15 वर्षांच्या मुलीवर हल्ला झाला.


राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील कोटरा गावात राहणारी रिंकू कनवर हिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला. या हल्ल्याच्या बातम्या आल्यावर तिला गावातील रुग्णालयातून उदयपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे काही दिवस उपचार केल्यावर तिला डिस्चार्ज देऊन रुग्णवाहिकेतून गावच्या रुग्णालयात पाठविले. परंतु तिथे पोहचेपर्यंत तिचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. तिचे हल्लेखोर सापडलेच नाहीत. 2017 सालची ही घटना आहे. अशा असंख्य रिंकू आणि लक्ष्मी प्रचंड वेदना सोसत आहे काहींनी आत्महत्या केल्या, काही जगण्याची झुंज हरल्या. या अ‍ॅसिड हल्ल्यां बाबत सामान्य माणसांना फारशी माहिती नाही. त्याबाबतचा कायदा बहुतेकांना ज्ञात नाही. इतकेच नव्हे तर होरपळलेला चेहरा जीवन कसा जगतो याची जाणीवही अनेकांना नाही. याबाबत ‘छपाक’ चित्रपटातून जनजागृती होईल. पण ‘छपाक’पेक्षा दीपिका मोठी ठरली आणि अ‍ॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीवर आणखी अन्याय झाला. हा अन्याय  महाराष्ट्र सरकारने दूर करीत ‘तान्हाजी’प्रमाणे ‘छपाक’ करमुक्त करून एक महत्त्वाचा विषय सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे.


 महाराष्ट्र सरकारने दूर करीत ‘तान्हाजी’प्रमाणे ‘छपाक’ करमुक्त केल्याने,सर्व सामान सिनेरसिकांना इतिहासाची माहिती सोबत अँसिड हल्यांतील पिडीताची छळाला वाचा फुटून,तिची व्यथा जनते समोर येणे गरजेचे आहे.त्यामुळे दोन्ही चित्रपट करमुक्त केल्याने ,दोन्ही चित्रपटाला,महाराष्ट्र सरकारने न्याय दिला म्हटले तर वावगे ठरू नये.