<no title>

#PRESSNOTE


*चाणक्य मंडळाकडून 'माणूस' घडविण्याचे काम*


- बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रतिपादन; अविनाश धर्माधिकारी यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन


पुणे : "कार्यकर्ता अधिकारी असणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांनी चाणक्य मंडळाच्या माध्यमातून 'माणूस' घडविण्यासह राष्ट्रहित जपणारा युवक घडवला आहे. आज चाणक्य मंडळाचा विस्तार मोठा असून, त्यातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून देशसेवा करत आहेत. बाजारात रेडिमेड वस्तू सर्वत्र मिळतात; मात्र रेडिमेड माणसे मिळत नाहीत. ती घडवावीच लागतात. पगारवाढ, मोर्चे, आंदोलन न करता राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने चाणक्य मंडळ पावले टाकत आहे. राज्य करायचे असेल, संस्था चालवायची असेल त्यासाठी आवड असावी लागते. धर्माधिकारी यांच्यात ती आवड असल्याने ते गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी घडवत आहेत," असे गौरवोद्गावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी काढले.


विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित 'आत्म्याचे नाव अविनाश' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, डॉ. अनिल गांधी, वर्षा गांधी, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनावणे व सहसंपादक संदीप तापकीर, कवी संदीप खरे, डॉ. भूषण केळकर, खासदार अरविंद सावंत, पूर्णा धर्माधिकारी, धर्माधिकारी यांचे आई-वडील मंगला व भगवंत धर्माधिकारी, सासूसासरे अलका व अनंतराव गोगटे, सनदी अधिकारी बालाजी मंजुळे आदी मान्यवर उपस्थित होते.


डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ''प्रशासनाला लागलेली भष्ट्राचाराची कीड दूर करण्यासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. प्रशासनात काम करणाऱ्यांनी कार्यक्षम, संवेदनशील, प्रामाणिक पद्धतीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने प्रशासकीय सेवेत व संरक्षण दलात प्रवेश करत आहेत. या अधिकाऱ्यांना कार्यक्षम घडविण्याचे काम अविनाश धर्माधिकारी चाणक्य मंडळच्या माध्यमातून करत आहेत. पुण्याने देशाला प्रचंड क्षमतेची माणसे देशाला दिली. आताचे लष्करप्रमुख हेदेखील इथलेच आणि प्रशासकीय अधिकारी तयार करणारे धर्माधिकारीही पुण्याचेच आहेत, हा योगायोग आहे."


अविनाश धर्माधिकारी म्हणाले, "चरित्र लिहिण्यासारखे माझ्या हातून कोणतेही मोठे कार्य घडले, असे वाटत नाही. अजून खूप कार्य करणे बाकी आहे, कुटुंबाच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या साथीमुळे गेल्या पंचवीस वर्षापासून प्रशासकीय अधिकारी घडवण्याचे काम होत आहे. सर्वांच्या प्रेमापोटी हे चरित्रग्रंथ निर्माण झाले असून, ते सर्वाना अर्पण करतो. शिवाजी महाराज नेहमी प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देतात. जीवनात अनेक माणसे भेटत गेल्यामुळे जीवन समृद्ध झाले. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. कारण प्रशासकीय काम हे देशसेवा करण्यासाठी आहे. अधिकाऱ्यांनी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करावा. आताच्या पिढीने कोणत्या क्षेत्रात जायचे आहे, हे ठरवणे गरजेचे आहे. स्वतःची क्षमता ओळखून त्या क्षेत्रात जाणे गरजेचे आहे." यावेळी कसबा पेठेतील लहानपणीच्या आठवणींना धर्माधिकारी यांनी उजाळा दिला.


विशाल सोळंकी म्हणाले, ''अविनाश धर्माधिकारी सरांचा विद्यार्थी असून, त्याच्या भाषणांमधून राजकारण-समाजकारण असे विविध विषय शिकायला मिळाले. देशाच्या, विश्वाच्या समृद्धीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. वैश्विकतेचे भान, राष्ट्रप्रेम आणि चरित्रवान विद्यार्थी त्यांनी घडविले. विद्यार्थ्यांना घडविण्यामागे त्यांची २० ते २२ वर्षाची तपस्या आहे.'' अरविंद सावंत म्हणाले, ''धर्माधिकारींनी अनेक चाणक्य घडविले, हे त्यांचे काम चिरंतर राहणार आहेत. आमचे विचार बऱ्याच बाबतीत सारखे आहेत. ते शिवसेनेपासून स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी दूर गेले. चांगले विचार रुजवायचे आणि झिरपायचे काम त्यांनी चाणक्य मंडलच्या माध्यमातून केले.''


प्रास्ताविकात विशाल सोनी म्हणाले, "हे पुस्तक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी जसे निडर व सच्चेपणाने आयुष्य जगले, ते पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येईल. येत्या काळात हे पुस्तक इंग्रजीसह वेगवेगळ्या आठ ते दहा भाषेत भाषांतर करून प्रकाशित करण्यात येईल.'' डॉ. चित्रलेखा पुरंदरे म्हणाल्या, "धर्माधिकारी यांच्यावर चरित्रग्रंथ लिहता येईल का? असा प्रश्न सुरुवातीला पडला होता. परंतु जसे जसे सर्वांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली तसे तसे 'आत्म्याचे नाव अविनाश'च्या पुस्तकाची निर्मिती होऊ लागली. या पुस्तकात धर्माधिकारी यांच्या जवळपास तीस ते चाळीस गुणवैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आले आहेत." धर्माधिकारी सरांचे काम हिमालयाच्या शिखरासारखे आहे, त्यांनी अनेक चरित्रवान कार्यकर्ते अधिकारी बनविले, ते कार्य अविरत सुरू रहावे, असे बालाजी मंजुळे म्हणाले.


डॉ. अनिल गांधी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी सरांप्रती भावना व्यक्त करून त्यांचे अभिष्टचिंतन केले. अविनाश धर्माधिकारी यांनी दृक-श्राव्य माध्यमातून आपली यशोगाथा उलघडली. कवी संदीप खरे यांनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आरती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.