उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला ५-० गुणाने हरवत सुवर्णपदक पटकाविले. तसेच रौप्य पदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे यावर ८-२ अशी मात करीत रौप्य पदक पटकाविले.
५७ किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकरवर विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरूगुडे यांच्यामध्ये ८-८ अशी बरोबरी झाली. यावेळी आबासाहेब यांनी शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.
तर ७९ किलो गादी गटात रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वर १३ विरुद्ध ४ गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावर ४ विरुद्ध १ अशा गुण फरकाने मात देत अंतिम फेरी गाठली. उद्या, ४ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात रामचंद्र कांबळे विरुद्ध रवींद्र खरे यांची गादीवरील लढत होणार आहे.
पदकविजेत्या मल्लाला रोख पारितोषिक
या स्पर्धेमध्ये प्रत्येक वजनी गटातील पदकविजेत्या मल्लाला रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानुसार, सुवर्णपदक विजेत्याला २०,००० रुपयांचं, रौप्यपदक विजेत्याला १०,००० रुपयांचं तर कांस्यपदक विजेत्याला ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
आजचा अंतिम निकाल -
७९ किलो (माती विभाग)
सुवर्ण - हणमंत पुरी (उस्मानाबाद)
रौप्य - सागर चौगुले (सोलापूर जिल्हा )
कांस्य - धर्मा शिंदे (नाशिक)
५७ किलो (माती विभाग)
सुवर्ण - आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)
रौप्य - संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)
कांस्य - ओंकार लाड (नाशिक)