पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अफवांना ऊत, अंधश्रदेच्या बाजाराने अनेक गावे जागली!
_____________________________________
कोरोनाने चिंतेत असलेल्या नागरिकांमध्ये अफवा पसरल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे. अमुक गावातून फोन आला "लहान मुलांना धोका आहे, रात्र जागून काढा, दवाखान्यात विचित्र बालक जन्माला आले आहे" अशा एक ना अनेक अफवांनी रात्रभर अक्षरशः धुमाकूळ घातला. अंधश्रदेच्या या बाजाराने अनेक गावांनी रात्र जागून काढली. नातेवाईकांनी एकमेकांना फोन करून सर्वांचीच झोप उडवली. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सध्या कोरोनामुळे जग परेशान आहे. सर्वजण लॉक डाऊनमुळे घरातच आहेत. आपण एकविसाव्या शतकात असलो तरी अंधश्रदेचा लोकांवर विशेषतः ग्रामीण भागातील जनतेवर आणखी किती प्रभाव आहे याचा प्रत्यय रात्री आला. बुधवारी (दि. २५) रात्री उशिरा ग्रामीण भागात "दवाखान्यात विचित्र बालक जन्माला आले आहे, आपापली लहान बालके सांभाळा, झोपू नका" अशी अफवा पसरली. अवघ्या काही वेळातच वाऱ्याप्रमाणे अफवा पसरली. विशेष म्हणजे अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर त्या विचित्र बालकाचे फोटोही पोहोचले. मग ज्याला वाटेल तसे त्याने प्रसार केला. पाहता पाहता या अफवेने ग्रामीण आणि शहरी भागात धुमाकूळ घातला. अनेकांनी आपापल्या नातेवाईकांना फोन करून खात्री करून घेण्याच्या प्रयत्नात रात्र जागून काढली.
रात्री उशिरा सुरू झालेल्या अफवेच्या फोनांनी उजाडले तरी झोपू दिले नाही. विशेष म्हणजे कुणीही ठोस काही सांगत नव्हते. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित पालकांनीही लहान मुलांच्या काळजीपोटी रात्र जागून काढली. विज्ञान युगात असं काही घडतयं, हा अनुभव लज्जास्पद होता.
जुनेच फोटो व्हायरल
अफवा आणि पसरलेल्या फोटोबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे फोटो जुनेच असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र या फोटोंनी रात्रभर दहशत निर्माण केली.