पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*'नद्यांचे सौंदर्यीकरण नको ,मूळ प्रवाह जपा ' !:पर्यावणप्रेमींची मागणी*
------------------------------------
*जलस्रोत ,झरे वाचविण्याचे प्रयत्न आले पुस्तकरूपात !*
----------------------------------
“शहरी नद्यांचा आक्रोश” पुस्तकाचे प्रकाशन
पुणे :
'जागतिक तापमान वाढीच्या पार्श्व भूमीवर पुण्यासारख्या शहरांत नदी वाहती नसणं हा काही नदीच्या सौदर्यापुरता प्रश्न नसून तो शहरात राहणाऱ्या माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि या नदीच्या संपूर्ण पाणलोटास समजून घेत नदीला येवून मिळणारे झरे-ओढे संरक्षित झाल्याखेरीज नदी वाहती होणे अशक्य आहे. त्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत ,अशी मागणी जल तज्ज्ञ डॉ दत्ता देशकर , भूगर्भतज्ज्ञ डॉ उपेंद्र धोंडे ,बावधन झरा वाचविण्याच्या चळवळीतील कार्यकर्ते शैलेंद्र पटेल( जलदेवता सेवा अभियान ) यांनी केली .
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे १४ मार्च रोजी ११ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली . या पत्रकार परिषदेला पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी सौ. नीला पटेल,जल बिरादरी चे जालिंदर चांदगुडे (प्राजक्त प्रकाशन), मनीष घोरपडे,दीपक श्रोते (वसुंधरा सामाजिक अभियान),नरेंद्र चुघ, रवींद्र सिन्हा, मुकुंद शिंदे,अनंत घरत, डॉ. सचिन पुणेकर, नितीन शिंदे , महेंद्र घागरे, ललित राठी, सत्यजित भोसले उपस्थित होते.
शैलेंद्र पटेल यांचे , पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांचे नैसर्गिक जलस्रोतांस संरक्षण मिळालेच पाहिजे यासाठीचे कष्ट आणि झरे संवर्धनाचे प्रयत्न हे पुस्तक भू - गर्भ तज्ज्ञ डॉ उपेंद्र धोंडे यांच्या लेखणीतून व प्राजक्त प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले . करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर समारंभ टाळून अनौपचारिकरित्या पत्रकार परिषदेतच छोटेखानी प्रकाशन करण्यात आले. शैलेंद्र पटेल यांनी बावधन येथील जिवंत झरा वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली .
आळंदी ,नासिक , पंढरपूर आणि अन्य धार्मिक ठिकाणांची जल कुंडे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वखर्चातून शैलेंद्र पटेल प्रयत्न करतात .
*कचरा व्यवस्थापन केल्याशिवाय नदी संवर्धन अशक्य*
डॉ धोंडे म्हणाले ,' शासनाने पाणलोट नकाशा करावा. पुण्याभोवतीचे 200 ओढे वाचवले पाहिजेत.कचरा व्यवस्थापन केल्याशिवाय नदी संवर्धन शक्य नाही.पुररेषा नियम फक्त मुख्य प्रवाहपात्रास का? या प्रवाहाला येवून मिळणार्या असंख्य लहानमोठ्या झरे-ओढे प्रवाहांचे काय? जे प्रवाह नदीचं वाहणं ठरवितात? म्हणूनच मुळात नदी म्हणजे जमिनीवर वाहणारा प्रवाह यापेक्षा त्या प्रवाहाला वाहतं ठेवू शकणारा भूगर्भातला प्रवाह, हि संकल्पना लक्षात घ्यावी लागेल. मुख्य नदीस येवून मिळणार्या अशा या लहानमोठ्या ओढ्यांची संख्या मागील वीस वर्षांत ज्या झपाट्यानं घटली आहे तेच खरं तर पुराचे-प्रदूषणाचे आणि इतर बहुतांश जल समस्यांचे मुख्य कारण होय.हि बाब आजवर कुणी चर्चेत आणलेली नाही ? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना निर्भिडपणे प्रश्न विचारले पाहिजेत आणि जर उत्तरं मिळत नसतील तर तीव्र आग्रह धरला पाहिजे. ओढे, नाले बुजवून केलेल्या इमारतीत नागरिकांनी सदनिका घेवू नयेत. नदीचे सिमेंटीकरण म्हणजे नदीला मृत करण्याचा प्रयत्न असतो, हे शासनाच्या कधी लक्षात येणार ? रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नको तर वॉटर शेड डेव्हलपमेंट हवे आहे.
शैलेंद्र पटेल म्हणाले,' डोंगर, नदी, प्रवाह वाचवणारे कार्यकर्ते या पुस्तकातून दिसतात. जबाबदारी म्हणून आम्ही हे काम करतो. मात्र, धोरणे ठरविण्यावर त्याचा परिणाम झाला पाहिजे.
आपल्याकडे तर मुळात नदी म्हणजे काय” इथूनच सारा संभ्रम आहे. आज वर्तमानात शहरी भागातील जलस्रोतांचे संरक्षण व्हावे म्हणून, व्यवस्थापन म्हणून, पर्यावरण संवर्धन म्हणून नेमकी काय धोरणं राबविली जात आहेत, नेमक्या काय चुका घडत आहेत आणि भविष्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असे नेमके काय करता येईल अशा सर्व बाबींचे सखोल चिंतन व्हावे ,अशी मागणी पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेत केली .
*समाज जलसाक्षर होतो आहे का ?*
पाणी प्रश्नाची जाण खरंच वाढते आहे का ? समाज जलसाक्षर होतो आहे का ? असा सवाल डॉ. दत्ता देशकर यांनी केला.एखाद्या विशिष्ट जागेतून पाणी वाहिलं म्हणजे त्यास नदी म्हणायचं का? तेवढ्या जागेवरचेच नदीपात्र स्वच्छ केले, सौंदर्यीकरण झाले कि ते पुरेसे ठरेल का? आणि यासाठी किती परिश्रम वेळ खर्च होणार आहे व ते किती काळ टिकेल याचा विचार होतो का? आपण याबाबत संवेदनशील का राहत नाही असे प्रश्नही डॉ दत्ता देशकर यांनी उपस्थित केले .
घरी राहून देखील नदी संवर्धनाचे काम करता येईल. घरच्या वापरातून रसायने, डिटर्जट , साबण कमी करणे हेही योगदान असेल, असे दीपक श्रोते यांनी सांगीतले.
................................................