पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*"कोरोना" प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी*
*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन*
पुणे, दि. १४: ‘कोरोनाʼ च्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कौन्सिल हॉल येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन खताळ, उपायुक्त प्रताप जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे. चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वतः हून घरीच १५ दिवस स्वतंत्र रहावे, कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, अशा सूचना सर्वांपर्यंत पोहोचवा. परदेशातून आलेल्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा, मात्र या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करुन आलेल्या परंतु खासगी ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, जेणेकरून त्यांची माहिती ठेवणे प्रशासनाला सोयीस्कर होईल, असे सांगून ते म्हणाले, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक शिष्टाचार राखण्याबाबत प्रशिक्षित करुन शैक्षणिक संस्था परिसरातही स्वच्छता राहिल, याची दक्षता बाळगा. विद्यार्थ्यांनी गर्दीत जाणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार घ्यावा, सुटीच्या कालावधीत अनावश्यक बाहेर फिरु नये. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, शैक्षणिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न, विद्यार्थ्यांची सुरक्षा, पालकांनी घ्यावयाची खबरदारी आदी विषयी उपस्थितांनी शंका विचारल्या, त्यावर डॉ.म्हैसेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
0000000000