*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे, दि.२९- महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'कब कब, जब जब' या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोकसहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आले होते. द्वितीय पुरस्कार 'फुगा' व तिसरा पुरस्कार 'मनसखा' या लघुपटाला मिळाला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. दीपक राऊत, चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर,जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय समन्वय अधिकारी डॉ. राहूल शिंपी, उपसंचालक माहिती मोहन राठोड, अजय जाधव, मिलींद फाटक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चित्रपट दिग्दर्शक राजदत्त म्हणाले, चलचित्र माध्यमातून आरोग्य विषयक संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे. या महोत्सवात दाखविण्यात आलेले स्पॉट पाहून नवीन पिढी आरोग्य विषयक संदेश समाज मनापर्यंत पोहचवण्यात उत्सुक आहे, याची जाणीव झाली. उद्याचे सशक्त समाज जीवन या प्रयत्नातून दिसत असल्याचे राजदत्त यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने राबविलेला महाआरोग्य फिल्म फेस्टिवल हा उपक्रम स्तुत्य असून आज ख-या अर्थाने संत एकनाथांची आठवण होत आहे. त्यांनी शेतकरी व कष्टक-यांसाठी भारूड म्हटलं. समाजमनाला शिकविण्यासाठी लोकांना वाट दाखविली.तसाच काहीसा प्रयत्न होत असल्याचे आज दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक आशयावर विविध प्रकारच्या फिल्म तयार करणाऱ्या कलावंताचे अभिनंदन करून राज दत्त पुढे म्हणाले,समाजाची एकंदरीत स्थिती पाहता लोक धावपळीचे जीवन जगत आहे.परंतु ते डाॕक्टरांकडे दुःख हलके करीत असतात.म्हणून शासनाचे कौतुक आहे.यानिमित्ताने त्यांनी समाजासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आज मन संकुचित होत आहे. मात्र नवीन पिढी असे विषय घेऊन समाजापर्यंत जात आहेत ,ही दिलासा देणारी बाब आहे.चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिण्याचे काम करता येते,म्हणून हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
आरोग्य शिक्षण कार्यात चित्रपट माध्यमाचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. आरोग्यदायी समाजासाठी कला प्रबोधन चित्रपट, माहितीपट व टीवी स्पॉट या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी चित्रपट निर्माते विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रातील घटक यांच्या सहभागाने चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे संचालक अर्चना पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध भागातून एकूण 122 स्पर्धकांनी आपले आरोग्य विषयक माहितीपट टीवी स्पॉट सादर केले. त्यापैकी 48 स्क्रीनिंग साठी निवड करण्यात आले. यातील 16 स्पर्धकांना रोख बक्षिसे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणाले, या महाआरोग्य चित्रपट महोत्सवामुळे आरोग्य व प्रतिबंधात्मक ज्ञान योजना पोचण्यासाठी मदत होणार असून गावपातळीपर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. 'आपले आरोग्य ही जबाबदारी' या विषयावर प्रबोधन करण्यासाठी या माध्यमांचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांचा शुभेच्छा संदेश दाखविण्यात आला. उप संचालक मुक्ता गाडगीळ, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या सह इतर उपस्थित होते.
0000
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*