फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महानगरपालिकेतील कोव्हिड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा                                                             -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महानगरपालिकेतील कोव्हिड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा
                                                            -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


  पुणे, दि.14: फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महानगरपालिकेतील कोव्हिड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.


  काही नागरिक फ्ल्यू सारखी (सर्दी, खोकला, ताप इ.) लक्षणे आढळुन आल्यानंतर स्वत: उपचार करवून घेत आहेत किंवा स्थानिक खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत, असे आढळून येत आहे. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 10 दिवसानंतर या रुग्णामध्ये आजार गंभीर  किंवा जीवघेणा होत असल्याचे आढळुन आले आहे. 
  सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करण्यात येते की, नागरिकांनी फ्ल्यू सारखी लक्षणे (सर्दी, खोकला, ताप अशाप्रकारे त्रास इ.) दिसून आल्यास महानगरपालिकेच्या फ्ल्यू क्लिनिक मध्ये दाखवून घ्यावे. अशा क्लिनिक मधील डॉक्टर नागरिकांच्या लक्षणाच्या आधारे आपली कोविड-19 साठी चाचणी करायची आवश्यकता आहे अथवा नाही याबाबत निर्णय घेतील. तर कोव्हिड-19 साठी चाचणी करावयाची आवश्यकता असेल तर पुणे शहरात 19 ठिकाणी चाचणी करीता नमुने घेण्याची सोय आहे. पुणे शहरातील 19 ठिकाणी कोव्हिड-19 च्या  निदाना करीता नमुने घेण्याची सोय केली आहे. यापैकी काही नावे पुढीलप्रमाणे आहेत: नायडू रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, भारती विद्यापीठ, डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भोसरी रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, सहयाद्री रुग्णालय, कोथरुड ही आहेत.


         जिल्हयातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही रुग्णास फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास पुणे व पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या फ्ल्यू क्लिनीक मध्ये किंवा कोव्हिड केअर केंद्रामध्ये नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून  सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध इ.ठिकाणी पाठवावे. अशा रुग्णांना वेळेवर पाठवून दिल्यास त्यांची आवश्यकतेनुसार कोव्हिड-19 साठी नमुने घेऊन निष्कर्षानुसार औषधोपचार करता येतील, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.


000000000