पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मध्य प्रदेशातील 8 संशयितांना धारणी तालुक्यातील गावात पकडले, 7 जण फरार
__________________________________
अमरावती जिल्ह्यातल्या एका गावातून 8 जणांना पोलिसांनी पकडले आहेत. हे सगळे मध्य प्रदेशातुन आलेले मुस्लिम असल्याची माहिती मिळत आहे. या 8 जणांसोबत असलेले 7 जण पळून गेल्याने हे सगळे जण इथे का आले होते याचं गूढ वाढलं आहे. धारणी तालुक्यातील कुसुमकोट गावामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
धारणीपासून 3 किमी अंतरावरील कुसुमकोट नावाचे गाव आहे. इथे 31 मार्चच्या सकाळी एका क्रुझर गाडीमध्ये 15 लोक आले होते. या सगळ्यांनी दोन घरात आश्रय घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. संचारबंदी, जमावबंदी आहेच शिवाय सबळ कारणाशिवाय कोणाला प्रवास करण्यासही मनाई करण्यात आली आहे. उत्सव, सण, यात्रा यांच्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे. 5 पेक्षा जास्त माणसे एका ठिकाणी जमू नयेत असे स्पष्ट आदेश असताना हे सगळेजण एकत्र कसे आले आणि त्यांना वाहनाने प्रवास कसा करता आला असे प्रश्न प्रत्यक्षदर्शींना पडले होते, ज्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बुधवारी रात्री 11 वाजता दोन घरातून 8 जणांना ताब्यात घेतले. या सगळ्यांना आश्रय देणाऱ्या 4 स्थानिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र 7 जण तिथून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांना कमला नेहरु मुलींच्या आदिवासी वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील खंडवा, बुऱ्हाणपूर येथून हे सगळेजण आले असल्याची माहिती मिळाली आहे. 31 मार्च पासून 1 एप्रिलपर्यंत त्यांनी कुसुमकोट गावात मुक्काम केला होता. या सगळ्यांना ताब्यात घेतले तेव्हा गावात तणाव निर्माण झाला होता असे कळते आहे, मात्र पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे.