प्रेरक महामानव "राम"*  -------  रामाचा जप करण्याबरोबर रामचारित्रमधून काय शिकावे   .        *प्रशांत धुमाळ*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*प्रेरक महामानव "राम"*
 ------- 
रामाचा जप करण्याबरोबर रामचारित्रमधून काय शिकावे 


 .        *प्रशांत धुमाळ*
   
       *रामाने केलेले वडिलांच्या आज्ञेचे पालन,त्याचे मातृप्रेम,राजसत्तेसाठी भावाबरोबर संघर्ष करण्याऐवजी सत्तेचा त्याग करून वनवास पत्करण्याचा त्याचा निर्णय,रामाला उत्तम बोरेच द्यावीत या भावनेने भिल्ल शबरीने चाखून दिलेली बोरे खाण्याचा त्याचा उमदेपणा,आदिवासी निषादराजाबरोबरची त्याची जिव्हाळ्याची मैत्री,वानर मानलेल्या सर्वसामान्य लोकांबरोबरचा त्याचा स्नेहभाव,पुरुषांनी आणि विशेषत: राजांनी बहुपत्नीकत्व स्वीकारण्याच्या काळातील त्याचे एकपत्नीव्रत,त्याचे प्रजाप्रेम इ.कारणांनी तो आदरणीय आहे.*


*भारतीय समाजाच्या दृष्टीने रामाचे चरित्र एका खास कारणाने आदर्श आणि मार्गदर्शक आहे*.
*आपल्या समाजात असंख्य कुटुंबांतून भाऊबंदकीच्या कारणाने संघर्ष झाल्याचे आढळते.त्यातही शेतीशी सबंधित असलेल्या कुटुंबांमधून शेताच्या छोट्या छोट्या तुकड्यांची वाटणी करण्यावरून आणि अगदी शेतांच्या बांधावरूनही अतिशय क्लेशकारक आणि दु:खपर्यवसायी घटना घडत असतात .छोट्या-छोट्या कारणावरून सख्ख्या भावांमध्ये वितुष्ट आल्याचे आणि वैर निर्माण झाल्याचे दिसते.अशा परिस्थीतीतून जाणार्या लोकांना बंधुप्रेमाची आणि सुखीसमाधानी जीवनाची दृष्टी देण्याचा आदर्श रामाच्या चरित्रातून मिळतो.*


*राजघराण्याच्या परंपरेनुसार राजा बनण्याचा नैतिक अधिकार असतानाही आणि संघर्ष करून राजसत्ता स्थापण करण्याचे सामर्थ असतानाही रामाने त्याप्रकारचा विचार मनात आणला नाही.उलट वडिलांचा शब्द मानून वनवास पत्कारण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला.वनात जाण्याचा आदेश फक्त रामासाठी असतांना लक्ष्मण स्वत:हून रामाबरोबर वनवासाला जाण्याचा निर्णय घेतो.त्याच्याही मनात सत्तालोभाचा स्पर्ष होत नाही घडलेल्या प्रकारामुळे भरताला सत्ता आयती मिळण्याची संधी प्राप्त झालेली असतांना तो ती सत्ता नाकारण्याचे साफ नाकारतो.शतृघ्नही सत्तेचा मोह धरत नाही.आपल्याकडच्या भावाभावांमध्ये होणार्या संघर्षाच्या वातावरणात या चार भावांचे चरित्र हा एक अतिशय सुखद ,निर्मळ आणि मनाला प्रसन्न देणारा इतिहास आहे.म्हणूनच,रामाचे आणि त्याच्या भावांचे चरित्र हा आपल्याकडच्या कौटुंबिक कलहरोगावरचा एक अतिशय गुणकारी उपाय आहे,उतारा आहे*.


       *रामाचे चरित्र पाहताना शबरीने दिलेली बोरे खाण्याचा प्रसंग आवर्जून ध्यानात घेतला पाहिजे.समाजाच्या सामान्य स्तरातील स्त्रीने आत्मीयतेने दिलेली बोरे रामाने खाल्ली.एवढी गोष्ट देखील महत्वाचीच आहे.पण ती बोरे उष्टी असतांनाही खाणे,ही घटना रामाच्या व्यक्तिमत्वाला अधिक उदात्त बनवते.बोराच्या उष्टेपणाला महत्व न देता,बोरे स्वत: चाखल्यानंतर रामाला देण्याच्या शबरीच्या कृतीमागची निरागस भावना रामाने ओळखली.रामाला जी बोरे द्यायची ती आंबट असता कामा नये,म्हणून ती आधी चाखून पाहावीत आणि आंबट बोरे बाजूला ठेवून स्वादिष्ट बोरेच त्याला द्यावीत,या भावनेने शबरीने प्रत्येक बोर चाखून पाहिले आपल्या या कृतीमुळे रामाला दिली जाणारी बोरे उष्टी होत आहेत ,हे तिच्या भोळ्या मनाला समजले नाही.परंतु रामाने बोरांच्या उष्टेपणाकडे न पाहता,तिच्या निष्पाप भावनेची कदर केली.रामाचे हे वर्तन त्याच्या चरित्राला विलक्षण उंचीवर घेऊन जाणारे आहे.त्याच्या चरित्रातील घटनांचा विचार अशाच पद्धतीने करता येतो.*
    
      !! जय श्रीराम !!