पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबईतील ३ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण
___________________________________
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असताना मुंबईतही याची वाढलेली आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे. अशातच महिलेसोबत एका ३ दिवसाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. २६ मार्च रोजी ही महिला पतीसोबत डिलिव्हरीसाठी चेंबूर येथील हॉस्पिटलला गेली होती. डिलिव्हरीनंतर महिला आणि मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.
पतीने या खासगी हॉस्पिटलवर आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीला कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड दिला होता. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली. याबाबतचं वृत्त एनबीटीने दिलं आहे. ज्या दिवशी माझ्या पत्नीला हॉस्पिटलला दाखल केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलला समजलं की, माझ्या पत्नीच्या बाजूला असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांनी हे आमच्यापासून लपवून ठेवलं असं पतीने सांगितले.
तसेच ज्यावेळी प्रकरण आणखी वाढलं त्यावेळी आम्हाला कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले. त्यासाठी आम्ही बीएमसीकडून ज्या खासगी लॅबना टेस्टची परवानगी दिली आहे त्यांना बोलावून सँपल दिलं. रिपोर्टनुसार माझी पत्नी आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २४,८१८ लोक क्वारंटाइनमध्येस, तर १८२८ लोक आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यातील सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर्स यांना एक जास्तीची पगारवाढ देण्याची शिफारस आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत असल्याचेही ते म्हणाले.