जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दिनांक 4- कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लॉकडाऊनच्‍या  कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या   कक्षाच्‍या  कामकाजाकरिता 2 तहसिलदार, 3 नायब तहसिलदार व अन्य 7 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून या  कक्षाचे कामकाज 24X7 सुरु राहणार आहे. विस्थापित कामगारांच्या समस्याकरिता स्थापन केलेल्या या कक्षाचा संपर्क क्रमांक 020 26111061 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7517768603 असा आहे.


            या  कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरिता कामगार उप आयुक्त  व्ही. सी. पनवेलकर (भ्रमणध्वनी क्रमांक 9822348676) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचा संपर्क क्रमांक 020/25541617,020/25541619  हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून  औदयोगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( भ्रमणध्वनी क्रमांक 7020065507 आणि दूरध्वनी क्रमांक 02027373022) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


                                    91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा- जिल्‍हाधिकारी राम


    विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 50 निवारागृहे, साखर कारखान्यांमार्फत 110 निवारागृहे सुरु करण्यात आली असल्याचेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.  जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 50 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 442 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 246 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3442 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत असल्‍याचेही  जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.


            दिनांक 1 एप्रिल, 2020 ते दिनांक 3 एप्रिल, 2020 अखेर सदर कक्षात विस्थापित कामगारांच्या एकूण 349 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारीचे महसूल विभागामार्फत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपजिल्‍हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.