पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री. राम यांची भेट*
*कोरोना रुग्ण संख्येत भर पडू नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन*
पुणे,दि.6: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे स्मार्ट सिटी कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त राजेंद्र मुठे आदी अधिकारी उपस्थित होते.
करोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी चर्चा करुन योग्य ते निर्णय घेण्यात आले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, "पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने नागरिकांनी घरी राहून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन योग्य ती पावले उचलत असून अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.
डॉ. के. व्यंकटेशम यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
शेखर गायकवाड यांनी पुण्यातील कोरोना संशयित, पॉसिटिव्ह रुग्ण, हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा-सुविधा आदींबाबत माहिती दिली.
पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने कोविड संबंधी एकात्मिक डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून, त्याअंतर्गत दैनंदिन माहिती अद्ययावत आणि मॅपिंग करण्यात येत असून, त्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात महत्त्वपूर्ण उपयोग होत असल्याचे, आयुक्त गायकवाड व रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
बैठकीत कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री, उपलब्ध साधनसामुग्री, पीपीई किट, औषधसाठा तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व डॉक्टरांसाठीच्या आवश्यक सुविधा आदीं विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
00000