कुपोषण कमी होत नसल्याने आरोग्य आणि अंगणवाडी यंत्रणा लागली कामाला तालुक्यातील 160 कुपोषित बालके

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



कुपोषण कमी होत नसल्याने आरोग्य आणि अंगणवाडी यंत्रणा लागली कामाला

तालुक्यातील 160 कुपोषित बालके


कर्जत,ता.14 गणेश पवार

                          कर्जत तालुक्यातील कुपोषण हे दीडशेच्या पार आहे,त्यामुळे कुपोषणाची आकडेवारी शंभर च्या आत आणण्यासाठी आता रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपाययोजना करण्याचे आदेश कर्जत पंचायत समितीला दिले आहेत.दरम्यान,त्यानुसार कर्जत पंचायत समिती,आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास विभाग कामाला लागले असून कुपोषण कमी करण्यासाठी नियोजन केले आहे.मार्च महिन्यात 169 तर एप्रिल महिना अखेर 160 कुपोषित बालके कर्जत तालुक्यात आहेत.

                        कर्जत तालुक्यात सध्या सॅम श्रेणीमधील 21 तर मॅम श्रेणीत 139 अशी 160 बालके कुपोषित आहेत.कर्जत तालुक्यातील वाढते कुपोषण ही या उन्हाळयात आणि त्यासोबत आलेल्या कोरोना मध्ये धोक्याची बाब आहे.त्यामुळे कर्जत तालुक्यातील कूपोषण कमी करण्यासाठी डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची कठोरपणे अमंलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना करता येथील यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी नितीन मंडलिक यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक बोलावली होती. पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी बालाजी पूरी,तालूका आरोग्य अधिकारी सी के मोरे, एकात्मीक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर,निशीगंधा भवाळ,कम्युनिस्ट अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे अशोक जंगले ,शाताराम निरगूडा तसेच तालूक्यातील एकात्मिक बालविकासच्या पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

                      कुपोषण कमी करणेसाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत सूचना महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण डॉ. एपिजे अब्दूल कलाम अमृत आहार योजनेच्या अमंलबजावणीमध्ये कोणतीही हयगय करू नये अशी सूचना अशोक जंगले यांनी केली.कुपोषण कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाच्या सर्व पर्यवेक्षिकांनी कार्यक्षेत्रातील अगंणवाडी केंद्रांना भेटी देऊन पोषण आहार आणि बालकांची आरोग्य स्थिती याबाबत माहिती संकलीत करावी.गरोदर महिला आणि स्तनदा माता यांची विशेष काळजी घेण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी करावी.कँन प्रकल्पातंर्गत आदिवासी विकास विभागाने बनविलेल्या भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती करावी.

                      लाँकडाउन मुळे सध्या अगंणवाडी भरवली जात नाही,मात्र तालूक्यातील राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील वैद्यकीय अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन सर्व बालकांची आरोग्य तपासणी करावी.संपूर्ण महिनाभर वैद्यकीय अधिकारी,आरोग्य विभागाच्या आशा वर्कर आणि अगंणवाडी सेविका तसेच कँन प्रकल्पाच्या कार्यकर्त्याच्या समन्वयातून कूपोषित बालके,स्तनदा माता यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सूचित करण्यात आले.तसेच अंगणवाडी बंद असल्यातरी त्यांना पोहचविण्यात येत असलेला पोषण आहार हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या घरोघरी पोहोचवत आहेत किंवा नाही यावर लक्ष ठेवतानाच डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची बिले देण्याची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे महिला आणि बालविकास विभागाचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी स्पष्ट केले.