पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कर्जत,ता.5 गणेश पवार
कर्जत तालुक्यात निसर्ग चक्रीवादळ यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे खांब कोसळले असून त्याचवेळी वीज रोहित्र देखील कोसळले आहेत.वीज रोहित्र नादुरुस्त झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नळपाणी योजना बंद पडल्या आहेत.दरम्यान, महावितरण कडून वादळात कोसळलेले 200 विजेचे खांब बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आज दिवस अखेर 50 खांब उभे करण्यात महावितरण ला यश आले आहे.तर तालुक्यातील ग्रामीण भागातील काही भाग वगळता अद्याप येथे अंधार कायम आहे.
कर्जत तालुक्यात मुख्य वीज वाहिनीचे 68 तर गावागावात वीज पुरवठा करणारे 140 खांब वादळाने कोसळून गेले आहेत.त्या कोसळलेल्या खांबांमुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आणि आता युद्धपातळीवर त्या खांबांची दुरुस्ती महावितरण कडून करण्यात येत आहे.तालुक्यात निसर्ग चक्रीवादळ नंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश येताना दिसत आहे.त्यात कर्जत आणि माथेरान येथील वीज पुरवठा 4 जून च्या रात्री सुरू झाला आहे.तर कर्जतसह दहिवली,नेरळ,कडाव,कशेळे येथील वीज पुरवठा सुरू झाला असला तरी त्या त्या वीज उपकेंद्र परिसरातील सर्व गावांची वीज मात्र सुरू झाली नाही.पूर्वी खोपोली येथून कर्जत तालुक्याला वीज यायची आणि त्यामुळे एका ठिकाणी जरी तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण तालुका अंधारात असायचा.मात्र कर्जत कळंबोली येथे वीज केंद्र झाल्यानंतर कर्जत तालुक्यात कर्जत,नेरळ,कळंब वारे, कशेळे,कडाव येथे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने आता तालुक्यात कोणतीही तांत्रिक बिघाड झाली तरी संपुर्ण तालुका अंधारात जात नाही.
मात्र तरीदेखील आज 5 जून पर्यंत वादळाने कोसळलेल्या एकूण खांबांपैकी जेमतेम 50 खांब उभे करण्यात महावितरण ला यश आले आहे.त्याच वेळी ग्रामीण भागात आता विजेचे खांब उभे करण्याची कामे सुरू असून दुर्गम भागातील तुंगी येथे देखील विजेचे खांब वादळाने जमीनदोस्त झाले असून शिंगढोल येथे देखील विजेचे खांब मोठ्या प्रमाणात कोसळून गेले आहेत.ग्रामीण भागात मागील तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने विजेअभावी त्या त्या गावातील नळपाणी योजना या बंद झाल्या आहेत.त्यामुळे अनेक गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.त्यात तालुक्यातील-- गावातील केवळ विजेचे खांब कोसळले नाहीत तर तेथील वीज पुरवठा करणारी वीज रोहित्र देखील जमिनीवर खाली पडले आहेत.
निसर्ग चक्रीवादळ यामुळे कोलमडून पडलेल्या वीज रोहित्र यात कर्जत मुद्रे भागातील रोहित्र बदलावे लागणार आहे.तर कडाव विभागात सर्वाधिक नुकसान वादळाने केले असून तेथील नांदगाव,बळीवरे, रोकडेवाडा,खांडस नळपाणी योजना, आणि पाटोळे फार्म जवळ असलेले वीज रोहित्र जमिनीवर कोसळले आहे.तर दहिवली सेक्शन मध्ये मोहिली,सांडसी,तिवणे आणि कळंब विभागातील माले या गावातील वीज रोहित्र कोसळले आहे.या सर्व ठिकाणी वीज रोहित्र कोसळल्याने नळपाणी योजना बंद आहेत.त्याचवेळी तालुक्यातील 140 नळपाणी योजना या विजेचे खांब कोसळल्याने दोन दिवसांपासून बंद पडल्या आहेत अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.विजेचे खांबांचा कर्जत तालुक्यात पुरेसा साठा आहे,मात्र वीज रोहित्र हे पनवेल येथून दुरुस्त करून आणावे लागत असतात. त्यामुळे पनवेल येथे एकावेळी तालुक्यातील सर्व वीज रोहित्र नेऊन तात्काळ दुरुस्त करून आणणे शक्य नाही.त्याचवेळी पनवेल आणि पेण विभागात मोठया प्रमाणात वीज रोहित्र वादळात कोसळले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील वीज सुरळीत करण्यासाठी काही अवधी लागण्याची शक्यता आहे