पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पंढरपूर :- असं म्हणतात, ‘देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन होतं’.. आमच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी आषाढी वारी... सन 2018 मध्ये आषाढी निमित्त पंढरपूरातच होतो, पण पुण्यात अचानक तत्कालिन मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने दशमीच्या रात्रीच पुण्याला परत निघावं लागलं होतं... श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेवून... पंढरपुरात येवूनही श्रींचं प्रत्यक्ष दर्शन न झाल्याची रुखरुख मनात होतीच...
सध्या कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. संपूर्ण विश्वावर महामारीचं सावट आहे. ही परिस्थिती विचारात घेवून आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीप्रमाणं पार पडणं शक्य नव्हतं. अनेकांना इच्छा असूनही वारीमध्ये सहभागी होता आलं नाही. परिस्थितीमुळं घरात राहूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागलं. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता भक्तीभावानं तथापि, शासकीय नियमांचं पालन करुन साजरा होणार होता. आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्हणूनही ओळखली जाते. या वर्षी बुधवार 1 जुलै, 2020 रोजी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा करणार असल्यानं शासकीय स्तरावर प्रसिध्दी विषयक कार्यवाही करणं गरजेचं होतं.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशासाठी आरोग्यविषयक सर्वच खबरदारी घेण्यात येत होती. सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आणि पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी आषाढी वारी वृत्तांकनासाठी येणा-या सर्वांची ‘कोरोना’ चाचणी करणे बंधनकारक असल्याचं कळवलं. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र पाठवून आमची ‘कोरोना चाचणी’ करण्याची विनंती केली. ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी तातडीने कोरोना चाचणी केली. पुण्यामध्ये 9 मार्चपासून कोरोना वृत्तांकन करत असल्यानं आमच्या सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण सर्वांचीच चाचणी ‘निगेटीव्ह’आली. दरम्यान, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना वाहन प्रवेश पास बाबत विनंती केली, त्यांनीही तातडीने वाहन पास उपलब्ध करुन दिले. आवश्यक ती पूर्वतयारी झाल्यानंतर पुण्याहून दोन पथकं पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. पथकामध्ये माहिती सहायक संदीप राठोड, विलास कसबे, व्हिडीओ कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार नितीन सोनवणे,चंद्रकांत खंडागळे, सुनील झुंजार,जितेंद्र खंडागळे यांचा समावेश होता. प्रत्येकाला आषाढी वारीचा पूर्वानुभव असल्यानं पंढरपूरपर्यंतचा मोकळा रस्ता पाहून त्यांच्या गप्पांमध्ये वारी वृत्तांकनाच्या जुन्या आठवणींचाच समावेश होता.
ना टाळ-मृदुंगाचा गजर, ना भागवत पताका घेतलेले वारकरी.. ना तुळशी डोक्यावर घेतलेल्या मायमाऊली.. ना विठूनामाचा जयघोष.. पूर्वी वारक-यांच्या गर्दीमुळे वैताग वाटायचा, पण आता रस्त्यात कुठेही वारकरी दिसत नाही.. टाळ-वीणा-मृदुंगाच्या साथीनं ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय’, असं कानावर पडत रहायचं... भक्तीरसाचा महापूर पाहून आलेला वैताग क्षणात दूर व्हायचा.. मन आनंदी, उल्हासित व्हायचं.. आज मात्र यापैकी काही अनुभवायला मिळालं नाही.. म्हणून त्यांचं मन खट्टू होतं.. पण त्याचवेळी ही ‘आगळी-वेगळी वारी’अनुभवायला मिळत असल्याचा एक वेगळाच आनंद होता.. रस्त्यात ठिकठिकाणी पोलीस चौक्या होत्या. मुख्यमंत्री हे वाहनानं येणार असल्यानं योग्य ती दक्षता घेण्यात आली होती. परिसरातून कोणी वारकरी पंढरपुरात येवू नये, यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही करण्यात येत होती. पोलीस प्रत्येकाशी प्रेमानं आणि समजूतीनं बोलत होते. नेहमी असणारा ताण कोणाच्याही चेह-यावर दिसत नव्हता.
दशमीच्या रात्री 8 वाजता आमचं पथक पंढरपुरात पोहोचलं. संचारबंदीमुळं रस्त्यावर सामसूम दिसत होती. चंद्रभागा तीरावरही शुकशुकाट जाणवत होता. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, पोलिसांचा मात्र कडेकोट बंदोबस्त दिसत होता. ज्या रस्त्यावरुन पायी जायला अर्धा-पाऊण तास लागायचा, त्या रस्त्यावरुन 10 मिनिटांत जाता आलं, याचं पथकातील प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं. पंढरपूरच्या उप माहिती कार्यालयात पोहोचल्यावर प्रसिध्दी नियोजनाचा आढावा घेतला. आवश्यक ते सर्व नियोजन झालेलं होतं. पथकाची ‘भक्तनिवास’मध्ये निवासाची व्यवस्था होती. एकादशीच्या पहाटे श्रींची महापूजा होणार असल्यानं रात्रीच मंदिरात जावं लागणार होतं. स्नान आणि नंतर भोजन करुन रात्री 10 वाजता मंदिरात प्रवेश केला. मंदिरावर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातही फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान, सह्याद्री वाहिनीवरुन शासकीय महापुजेचं थेट प्रक्षेपण होणार होतं. त्यांच्या पथकातील कर्मचा-याची कोरोना चाचणी ‘पॉझिटीव्ह’ आल्यानं तातडीनं पर्यायी व्यवस्था करण्यात आली. रोहन गवळी, विशाल गौड यांनी प्रक्षेपणाची धुरा सांभाळली. अंकुश चव्हाण, सचीन जाधव पत्रकारांशी समन्वय साधून होते. महापुजेपूर्वी मंदिर परिसर दोनदा फवारणी करुन निर्जंतूक करण्यात आला. नित्यपूजा, पाद्यपुजेला उपस्थित राहून दर्शन सोहळा अनुभवायला मिळाला.
पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच मानाचे वारकरी प्रतिनिधी ठरलेले विणेकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे, त्यांच्या पत्नी अनुसूया बडे यांच्या उपस्थितीत श्रींची महापूजा संपन्न झाली. परंपरेप्रमाणं विठ्ठल-रुक्मिीणीमातेची भक्तीभावानं पूजा करण्यात आली. फुलांचा आणि तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. पूजेनंतर मंदिर समितीच्यावतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मानाचे वीणेकरी दाम्पत्याचा सत्कार केला. ‘कोरोना’चं संकट लवकर नष्ट कर, असं साकडं देवाला घातल्याचं त्यांनी सत्कारप्रसंगी सांगितलं. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळं राज्याच्या विविध भागातून पंढरपूरमध्ये वारकरी पायी चालत येणं हे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पंढरपूरमध्ये संसर्गाचा मोठा धोका निर्माण करणारं ठरु शकत होतं. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक एकत्र आल्यास सामूहिक संसर्गाचा धोकाही होता. संसर्ग झालेले भाविक, वारकरी त्यांच्या भागामध्ये परत गेल्यानंतर त्या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या व्यतिरिक्त बुक्का विक्री, मूर्ती विक्रेते, हार-फूल विक्रेते, तंबोरे, टाळ,वीणा व फोटो विक्रेते यांच्यासारखे अनेक लहान-मोठे व्यावसायिक यात्रा काळात पंढरपूरमध्ये येत असतात. या जनसमुदायांमध्ये शारीरिक अंतर राखणं शक्य होणार नव्हतं. तसंच पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यामध्ये व्यस्त आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करुन आषाढी वारी पालखी सोहळा निवडक वारक-यांसोबत तेवढ्याच भक्तीभावानं साजरा करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.
पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरकडं शासनामार्फत सोपवण्यात आलेला आहे. या अधिनियमानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडं या मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन आलेलं आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडं श्री विठ्ठल रूक्मिणीचं पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील ३६ परिवार देवता तसंच पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता यांचं व्यवस्थापन करण्याचं कामकाज आहे. या सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा इत्यादी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखलं जातं. लाखो वारकऱ्यांच्या श्रध्देचं स्थान व उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात. या यात्रा कालावधीत अंदाजे १५ लाख भाविक पंढरपूर दर्शनासाठी येतात.
यंदाच्या आषाढी वारीसाठी अनेकांची इच्छा असूनही पंढरपूरला येता आलं नाही. आम्हाला मात्र शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून का होईना पंढरपूरला जाता आलं.. श्री विठ्ठल मंदिरात रात्री 10 वाजेपासून शासकीय महापूजा झाल्यानंतरही पहाटे साडे पाच पर्यंत श्री विठ्ठल –रुक्मिणीमातेचं डोळे भरुन मनोभावे दर्शन घेता आलं. यापूर्वी न झालेल्या दर्शनाची खंत दूर झाली...
आम्ही सारे एक प्रकारे भाग्यवंत ठरलो.
राजेंद्र सरग,
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
भ्रमणध्वनी- 9423245456