पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दगडूशेठ गणपती' ट्रस्टच्या जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा १० वीचा निकाल शंभर टक्के-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ची जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना व बालसंगोपन केंद्र
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत अहिल्यादेवी प्रशालेमध्ये शिकणारी सिद्धी शितोळे ही विद्यार्थीनी ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर, कोंढवा खुर्द येथील ट्रस्टच्या बालसंगोपन केंद्रातील विनय पाटोळे याने ८२ टक्के मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जय गणेश पालकत्व योजनेतील आणखी चार विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा पुढे गुण मिळविले असून ६ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. हुजूरपागेत शिकणारी रिया ओसवाल हिला ९५.२० टक्के, विमलाबाई गरवारे प्रशालेत शिकणारा सिद्धार्थ दहिभाते याला ९४.६० टक्के, रेणुका स्वरुप प्रशालेतील वैष्णवी चितळे हिला ९१.८० टक्के आणि रिशिका पासकंठी हिला ९१.४० टक्के गुण मिळाले आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. ट्रस्टतर्फे सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देखील केले आहे. मानवसेवेचे मंदिर उभारताना विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने देखील ट्रस्ट सातत्याने कार्यरत आहे.
पालकत्व योजनेतील विद्यार्थीनी सिद्धी शितोळे म्हणाली, आणखी शिक्षण घेऊन माझे सीए व्हायचे स्वप्न आहे. माझे वडील हयात नसून आई गृहिणी आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ट्रस्टने मदतीचा हात दिला आणि सर्वतोपरी जे सहकार्य केले त्याचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे.
* ट्रस्टच्या बालसंगोपन केंद्रातील मुलांचे घवघवीत यश
दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कोंढवा खुर्द येथे बालसंगोपन केंद्र चालविले जाते. त्यामधील वानवडी बझार येथील हरिभाऊ बळवंतराव गिरमे हायस्कूलमध्ये शिकणा-या विनय पाटोळे याने ८२ टक्के मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच रोहित साठे व करन कसबे याविद्यार्थ्यांनी देखील चांगले यश मिळविले आहे. सर्वाधिक गुण मिळविणा-या विनयला आयटी क्षेत्रात करिअर करायचे आहे. विनय हा इयत्ता १ लीपासून केंद्रामध्ये आहे. तो पर्वती येथील जनता वसाहतीमधील असून त्याची आई धुणे-भांडी ची कामे करते. प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळविले आहे.
*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. त्यातील यशस्वी विद्यार्थीनी सिद्धी शितोळे.