पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
पुणे दि.13: जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या सोई सुविधांची पाहणी करुन काही त्रूटींची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच कोविड रुग्णालय गतीने उभे करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
बिबवेवाडी येथे केंद्रीय कामगार कल्याण विभागाच्या वतीने नव्याने उभारणी करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाची जिल्हाधिकारी राम व मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी आ. माधुरी मिसाळ, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील, डॉ. सुनिल जगताप उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी रुग्णालयातील नव्याने उभारणी सुरू असलेल्या अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष व अन्य विविध कक्षांची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड 19 च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी रुग्णालयाला आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करा, ऑक्सीजन व्यवस्था तसेच इतरही अत्यावश्यक व्यवस्थांची उभारणीही तत्परतेने करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. तसेच कोविड रुग्णालय उभारणीत सोईसुविधांबाबत ज्या काही आवश्यक सुधारणा करावयाच्या आहेत. त्याबाबत संबंधीत यंत्रणेला सूचना देवून त्याची पूर्तता करुन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आ. माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी येथे कोविड रुग्णालय लवकरात लववकर सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगून या रुग्णालयाची 100
खाटांची क्षमता तसेच अतीदक्षता विभाग, व्हेंटीलेटर्स सुविधाही उभारली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी कामगार विमा विभागाचे प्रमुख अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.