पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पत्रकार परिषदेत एकवटल्या विविध संघटना


 


पुणे : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठीच्या बारा जागांचे बिगुल वाजले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा सरकारला मिळावा म्हणून अशा तज्ञ व्यक्तींच्या निवडीसाठी या जागा राखीव असतात. आजपर्यंत सत्तेवर असणाऱ्या पक्षांनी आपली राजकीय सोय पाहण्यासाठी या जागांचा वापर केलेला आढळतो. परंतु यावेळी राज्यपालांनी घोषणा केली आहे की, ज्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचीच निवड करण्यात येणार आहे. 


 


उपरोक्त विषयानुसार आम्हाला सांस्कृतिक क्षेत्रातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची निवड आमदारकीसाठी करण्यात यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची निवडणूक लढवून सर्वच जागांवर आपल्या प्रतिनिधींना निवडून आणून पुणे शाखेचे अध्यक्ष, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष, लावणी व लोककला महासंघाचे अध्यक्ष, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष अशी विविध पदांवर त्यांनी गेली कित्येक वर्ष कामे केली आहेत व अद्यापही करीत आहेत. 


 


कलाप्रकारातील लावणी, लोककला, ऑर्केस्ट्रा, नाटक, दूरचित्रवाणी, चित्रपट या सगळ्याच क्षेत्रात निर्माता म्हणून सर्वांना परिचित असून सर्वसामान्य कामगार ते स्टार कलाकार या सर्वांमध्येच ते प्रत्येकाचे काम करण्यासाठी पुढे असतात. कोल्हापूर विभागात आलेला महापूर असो किंवा सध्याची कोरोनाची आलेली महामारी असो. आपल्या कलावंत, निर्माता, तंत्रज्ञ, कामगार यांच्या मदतीला भोसले धावून गेलेले आहेत. अन्नधान्य, कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू, औषधे, रेशनिंग किट, आणि आर्थिक सहाय्य अशा स्वरूपात मदत ही केली आहे. कलाक्षेत्रात त्यांचे योगदान गेली तीस वर्षांपासून आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कारभार हाती घेतल्यापासून महामंडळाच्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल करून महामंडळ सर्वसामान्य सभासदाभिमुख केले आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबई असे मर्यादित असलेल्या महामंडळाचा नाशिक, औरंगाबाद, नागपूर, बीड, सातारा, सावंतवाडी अशा ठिकाणी शाखाविस्तार करण्यात आला. या सर्व ठिकाणच्या सभासदांना महामंडळ आपले वाटू लागले. स्वतः भोसलेंनी या ठिकाणी भेटी दिल्या. त्यामुळे याच कलावंतांना महामंडळाविषयी विश्वास वाटला.


 


सर्वसामान्य कलावंताला लुबाडणारी ऑडिशन पोलिस महासंचालकांच्या मदतीने महामंडळाच्या नियंत्रणात आणून आर्थिक फसवणूकीला चाप लावला. 


 


राज्य व केंद्र सरकार दरबारी चित्रपट महामंडळाची त्यांनी आश्वासक ओळख करून दिली. अनुदान योजना किंवा सेन्सॉर प्रक्रिया यात महामंडळाचे स्थान मेघराज यांनी निश्चित केले. सरकारकडून निर्मात्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी ते कायमच आग्रही राहिले.


 


महामंडळातर्फे वृद्ध कलावंतांना दरमहा आर्थिक सहाय्य योजनेला आर्थिक विधीचे पाठबळ त्यांनी पुरविले. अकस्मात वैद्यकीय सहाय्य योजनेतून अनेक कलावंतांना त्यांनी मदत करून आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.


 


कोल्हापूर येथे सुसज्ज कॉर्पोरेट स्वमालकीचे ऑफिस पुणे व मुंबई येथेही स्वमालकीच्या ऑफिसही त्यांनी खरेदी केले. गेल्या पन्नास वर्षात झाले नाही तेच काम अवघ्या चार वर्षात त्यांनी करून दाखवले. वेगवेगळ्या शहरांमध्ये सभासदांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करून कलावंतांना कलासाक्षर करण्याचे काम त्यांनी केले आहे.


 


संपूर्ण महाराष्ट्रात 46000 पेक्षा जास्त सभासद महामंडळाचे आहेत. या सभासदांचा व महाराष्ट्रातील सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती, सर्वच पक्षातील राजकीय व्यक्ती असा दांडगा जनसंपर्क मेघराज राजेभोसलेंचा आहे. कला क्षेत्रातील ज्ञान त्यांनी स्वतः अनुभवातूनच मिळवले आहे. याच ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य ते सरकार यांना मिळवून देण्यासाठी मेघराज सेतू ठरू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेत कलावंतांचा खरा आवाज व चेहरा पोहोचण्यासाठी आम्ही सगळे एकमुखाने मागणी करीत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी मेघराज राजेभोसले यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करावी व आमदार हे संविधानिक पदावर त्यांची निवड करावी. अशी मागणी महाराष्ट्राची लोकधारा चे निर्माते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे स्वीकृत सदस्य नितीन मोरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे मुख्य कार्यवाह प्रमोद रणनवरे, आम्ही एकपात्री संघटनेचे संतोष चोरडिया, संभाजी ब्रिगेड चित्रपट सेनेचे प्रकाश धिंडले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या शोभा कुलकर्णी,


अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे समिती सदस्य अनिल गुंजाळ आणि विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी केली.


 


मागणी करणाऱ्या संस्था :


 


संभाजी ब्रिगेड चित्रपट सेना


महाक्रांती चित्रपट सेना 


लहुजीशक्ती सेना चित्रपट आघाडी 


परिवर्तन कला महासंघ 


ऑल इंडिया कराओके आर्टिस्ट असोसिएशन बालगंधर्व परिवार 


लावणी निर्माता संघ 


लोककला संघ 


प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य 


रिपब्लिकन चित्रपट 


आर्ट डिरेक्टर असोसिएशन 


ऑल इंडिया डान्सर असोसिएशन 


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे


महाराष्ट्र पत्रकार संघ सांस्कृतिक विभाग 


एकपात्री परिषद पुणे 


नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न चित्रपट कामगार आघाडी 


छावा स्वराज्य सेना 


स्वराज्य चित्रपट संघटना 


जयगणेश लोक कला मंच 


पुणे फोटोग्राफी वेल्फेअर असोसिएशन


 


फोटो ओळ : पत्रकार परिषदेत संबोधित करताना महाराष्ट्राची लोकधारा चे निर्माते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे स्वीकृत सदस्य नितीन मोरे,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे मुख्य कार्यवाह प्रमोद रणनवरे, आम्ही एकपात्री संघटनेचे संतोष चोरडिया, संभाजी ब्रिगेड चित्रपट सेनेचे प्रकाश धिंडले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या शोभा कुलकर्णी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे समिती सदस्य अनिल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.