पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- पुणे महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. यासाठी त्यांना निधीची भरीव तरतूद करता आली नाही. त्याचबरोबर कोरोना संकटावर योग्य त्या उपाययोजना करण्यात महापालिकेचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारी हे असफल ठरले आहेत
आरोग्य प्रमुखांची नियुक्ती देखील निकषांनुसार झालेली नाही, त्यामुळे आरोग्य विषयक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी तातडीने नियुक्त करणे आवश्यक आहे.
डॉ.रामचंद्र हंकारे हे ‘आरोग्य प्रमुख’पदास न्याय देण्यास असमर्थ आहेत. आरोग्य प्रमुखांनी मार्च महिन्यात अंदाज पत्रकात आग्रही वाढीव तरतूद करायला हवी होती. खासगी रुग्णालयांशी करार करण्यासारख्या गोष्टींमध्ये देखील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना लक्ष घालावे लागत आहेत. पुणे मनपा ‘आरोग्य प्रमुखांनी’ मनपाच्या आरोग्य यंत्रणा व इन्फ्रास्ट्रक्चर वर अधिक लक्ष देवून त्या सक्षम करणे गरजेचे आहे पण एकंदर आढावा घेतां ते खासगी रुग्णलयांकडे कल असल्याचे प्रत्ययास येते, ही गंभीर बाब आहे.
सध्याच्या संकटकाळात आरोग्य प्रमुखांची नेमकी भूमिका काय आहे? कारण त्यांची सर्व कामे व कर्तव्ये आयुक्त व अति आयुक्त दर्जाचे अधिकारी हेच पार पाडत आहेत.
महापालिकेने कोरोना परिस्थितीत निवृत्त व माजी आरोग्य प्रमुख अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली नाही. “कोरोना विषयक हेल्पलाईन” प्रभावी ठरलेली नाही. हेल्प लाईन विविध हाॅस्पीटलचा अंतर्भाव असलेल्या डॅशबोर्डला जोडल्यानंतर जाहिरात करण्यात आली नाही. सरकारी, निमसरकारी रुग्णांलयांऐवजी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. आरोग्य विषयक उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र व सक्षम कार्यकारी अधिकारी देखील नेमला जाणे तातडीने गरजेचे आहे. याबाबत राज्यशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
स्थायी समितीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात पालिकेचे अंदाजपत्रक मांडले मात्र त्यामध्ये कोरोनासाठी तरतूद करण्यात आलेली नाही, हे धक्कादायक आहे. अंदाजपत्रकावर भाषण करताना माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते आबा बागुल यांनी यावर हरकत नोंदवली होती.
नागरिकांचे समुपदेशन याकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही मनपा ने कोरोना विषयक भिती घालवणे बाबत सकारात्मक विचार व प्रबोधने यांच्या ॲाडीओ व व्हीडीओ कॅसेट्स व रूग्णांचे ‘मानसिक स्वास्थ्य’देखील वाढवणे बाबत समुपदेशन करणे देखील औषधां इतकेच गरजेचे आहे.
आरोग्यासाठी खाजगी हॉस्पिटल, विमा योजना यावर पालिका अवलंबून आहे. वस्तुतः आपल्या सरकारी रुग्णालयांची पायाभूत यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या एका रुग्णालयाच्या जागेबाबत आम्ही उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सातव्या पंचवार्षिक योजनेतील तरतुदीनुसार १ हजार लोकसंख्येमागे एक बेड असले पाहिजे मात्र प्रत्यक्षात शहरात केवळ ३ ते ४ हजार बेडच उपलब्ध आहेत.
आरोग्य प्रमुखांची नियुक्ती करताना निवड समितीने डॉ. रामचंद्र हंकारे यांना असक्षम ठरवले होते, मात्र भाजपा नेत्यांच्या अट्टाहासामुळे त्यांची नियुक्ती केली गेली. खाजगी रुग्णालयांवर आरोग्य प्रमुखांचा बिलकुल अंकुश नाही. खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी ३ ते ५ हजार रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघात याबाबत पत्रकार परिषद घेऊन आम्ही याबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, सूर्यकांत मारणे(संचालक, पुणे अर्बन बँक), राजेंद्र खराडे ( पीएमपीएमएल इंटकचे अध्यक्ष ) या वेळी उपस्थित होते.
पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका : आबा बागूल
मुंबईतील कोरोना संक्रमण आटोक्यात येत असताना पुण्यात साथ वाढत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात भाजप आणि पालिकेची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. महापौर वगळता भाजपचे कोणीही काम करताना दिसत नाही, असा आरोप काँग्रेस गट नेते आबा बागूल यांनी यावेळी बोलताना केला.
कोरोना होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा पालिकेने केली पाहिजे. २४ तासांची अधिक प्रभावी “हेल्प लाईन” ऊभी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कोरोना झाल्यावर करावयाच्या उपाययोजनांसाठी स्वतंत्र यंत्रणा पालिकेने उभी केली पाहिजे. भाजपने, प्रशासनाने सर्व पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांना एकत्र विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.कोरोनाची प्रतिबंधक लस येत नाही, तोपर्यंत पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घरोघरी पोचवली पाहिजे, असेही बागूल यांनी सांगितले.