कुटुंब नियोजनामध्ये युवा पिढीचा सहभाग आवश्यक: डॉ. निशिकांत श्रोत्री

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम गरजेचे असून, त्यामध्ये संपूर्ण समाज घटकांचा सहभाग असणे व विशेषतः युवा पिढीमध्ये त्याविषयी माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभाग करून घेणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी व्यक्त केले. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आयोजित 'जागतिक लोकसंख्या दिन' या विषयावर ऑनलाइन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डाॅ. धनंजय लोखंडे, प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे, विभागप्रमुख डॉ. क्रांती बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आजचे कार्यक्रम आयोजित करण्यामागे असलेले उद्देश व महत्व स्पष्ट केले. तसेच भारताच्या एकूण लोकसंख्येविषयी माहिती देताना जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतामध्ये असून जगाला नवीन दिशा देण्याचे कार्य निश्चितच या तरुणाई मार्फत होईल, असा आशावाद व्यक्त करत या कार्यक्रमामुळे लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होईल, असे मत व्यक्त केले.


आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. धनंजय लोखंडे यांनी सध्याच्या काळामध्ये लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्यांना तोंड देत असताना समाजामध्ये लोकसंख्येविषयी माहिती देणारे व जागरुकता निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करण्याची गरज असून नेहमी असे समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रम बाबुरावजी घोलप महाविद्यालय राबवत असल्याबद्दल प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच 1986 च्या शैक्षणिक धोरणाविषयी थोडक्यात माहिती देत लोकसंख्या शिक्षण, लैंगिक शिक्षण तसेच लोकसंख्या बाबतचे धोरण याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.


याप्रसंगी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले प्रसिद्ध प्रसुतीशास्त्र व स्त्री रोग तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी लोकसंख्या वाढीमध्ये महत्त्वाचा घटक ठरत असलेल्या जन्म मृत्यू दर, बालविवाह, दारिद्र्यरेषेखालील जीवन, पुरातन रुढी व परंपरा, मूलतत्त्ववादी धोरणे, कुटुंब नियोजनाचा अभाव इत्यादी घटकावर परखडपणे आपले मत व्यक्त केले. तसेच भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणाची गरज असून त्याविषयी समाजामध्ये जागरुकता निर्माण करून व कुटुंबनियोजनाच्या साधनांचा वापर करून, कशाप्रकारे नियंत्रण करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


दिल्ली विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विभागातील प्रा. जे. पी. दुबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अॅड. श्रीकांत दळवी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विलास आढाव, आजीवन अध्ययन व शिक्षण विभागातील डॉ. संजय शिरसाठ, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागातील डॉ. नवनाथ तुपे, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे आदी मान्यवरांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.


या ऑनलाईन व्याख्यान सत्राचे सूत्रसंचालन डाॅ. क्रांती बोरावके, आभार प्रदर्शन प्रा. रोहिणी येवले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. भरत कानगुडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.


या ऑनलाईन व्याख्यानासाठी महाविद्यालयातील सुमारे 75 प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.