स्टार प्रवाहवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृह प्रवेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर उभारली राजगृहाची प्रतिकृती


 


 


 


स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा मालिकेत महत्वाचा ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे बाबासाहेबांचा दादर इथल्या राजगृहातील प्रवेश. ही वास्तू बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग. या वास्तूमधील त्यांचं वास्तव्य नेमकं कसं होतं हे पुन्हा एकदा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना अनुभवता येईल. दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर राजगृहाची हुबेहुब प्रतिकृती उभारण्यात आलीय. कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी राजगृहाचा हुबेहुब सेट उभारला आहे. हा सेट उभारण्याआधी त्यांनी दादर इथल्या राजगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन या ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास केला. राजगृहाची प्रतिकृती साकारणं हे खूप मोठं आव्हान होतं. स्टार प्रवाह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आव्हान पेलण्याचा निर्धार केला आणि ते प्रत्यक्षातही आणलं.


 


बाबासाहेबांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती पसरली. 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळं होत होती. म्हणून त्यांनी स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.


 


 


 


बाबासाहेबांनी स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स त्यांनी राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु झाले. सन १९३३ मध्ये राजगृहाचं बांधकाम पूर्ण झाले आणि बाबासाहेब आपल्या कुटुंबीयांसह राजगृह या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले.


 


 


 


बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. इतिहासाच्या या पाऊलखुणा पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतून अनुभवायला मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.