पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : मी काय केले यापेक्षा मी काय करायचे आहे अशी दृष्टी असेल तेव्हा तो व्यक्ती ध्येय समोर ठेवून उत्तम काम करू शकतो. त्यामुळे मी केले, कोणासाठी केले यापेक्षा मी आणखी काय करायला पाहिजे, कोणासाठी करायला पाहिजे असा विचार केला पाहिजे. देशावर आलेल्या कोरोनासारख्या संकटकाळी इतरांना मदत करून आपले कर्म आणि कर्तव्य तत्परतेने पार पाडले पाहिजे.असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रच्या विशेष संपर्क विभागाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आपला परिसर स्वच्छ अभियानांतर्गत ते बोलत होते. या अभियानांतर्गत जंतुनाशक फवारणी पंप व सोडियम हायपोक्लोराईडचे वाटप करण्यात आले. यावेळी पुण्याच्या इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भोसले, विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रच्या विशेष संपर्क विभागाचे प्रमुख किशोर चव्हाण, सदस्य श्रीकांत चिल्लाळ, नगरसेवक सम्राट थोरात आदी उपस्थित होते. यावेळी निलेश कांबळे, धनंजय गाडकवाड, कुणाल जगताप, ओंकार नाईक, हेमराज साळुंके यांनी सहकार्य केले.
गिरीष बापट म्हणाले, कोणत्याच धर्मात दुसºयाला कमी लेखा असे सांगितले नाही, तरी देखील इतरांना कमी लेखण्याचे चित्र समाजात दिसत आहे. धर्म हे एक नाव आहे परंतु त्याचा आत्मा म्हणजे प्रेम, शांती, सद्भावना या सगळ््याचा मिळून धर्म आहे. त्या विचारांनी प्रेरीत होऊन आपण काम करीत असतो. ते विचार समोर ठेवून हे कार्यकर्ते देखील काम करीत आहेत.
संजय भोसले म्हणाले, शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर आपण चांगले कार्य करू. आपल्या देशात प्रत्येक दहा किलो मीटरवर एक मंदिर आहे. प्रेमभाव शिकविणारा हिंदू धर्म आहे. भक्ती करीत असताना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे आपल्या समाजात सामाजिक कार्याला भक्तीची जोड दिसते, असे ही त्यांनी सांगितले.
किशोर चव्हाण म्हणाले, विश्व हिंदू परिषदेच्यावतीने वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रमांवर काही बंधने आली आहेत. तरीदेखील आपले कर्तव्य ही आपली सेवा समजून अशा संकटकाळी देखील विश्व हिंदू परिषद अनेकांना मदत करीत आहे. आज स्वत:बरोबर परिसर स्वच्छ असणे देखील तितकेच महत्वाचे असल्यामुळे आपला परिसर स्वच्छ अभियानांतर्गत शहराच्या पूर्व भागातील परिसरात औषध फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.
फोटो ओळ: विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्रच्या विशेष संपर्क विभागाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आपला परिसर स्वच्छ अभियानांतर्गत शहराच्या पूर्व भागातील परिसरात औषध फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले.