पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीसाठी दि. २० ऑगस्ट २०२०
पुणे, ता. २०:- राज्यातील खासगी विद्यापीठांनी एकत्र येत विद्यापीठांच्या कायद्यानुसार पेरा (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या संघटनेची स्थापना केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य शासनाची सीईटी केव्हा आणि कशी घ्यावयाची याचा निर्णय झालेला नाही. महामारीच्या काळात ही सीईटी घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची एमएच सीईटी रद्द करून इयत्ता १२ वीच्या गुणांकावर खासगी विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांना व्यासायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी केली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या पेरा या संघटनेत १२ खासगी विद्यापीठांचा समावेश झाला आहे. ही संघटना उच्च शिक्षणाच्या उत्कर्षांसाठी आणि राज्यातील स्वयं अर्थसाहित विद्यापीठांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करते. या संघटनेच्या सदस्यांची ८ ऑगस्ट २०२० रोजी बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र शासनातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार्या एमएच सीईटी परीक्षेला होणार्या विलंबामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होत नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी ही चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, राज्यावर कोरोना महामारीचे संकट वाढत आहे, अशात राज्य शासनाची एमएच सीईटी घेणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक होईल. म्हणून महाराष्ट्र शासनाने ही एमएची सीईटी परीक्षा रद्द करावी. १२ वीच्या गुणांकावर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास परवानगी द्यावी. या निर्णयाचा लाभ राज्य विद्यापीठांशी सलंग्न असणार्या महाविद्यालयांसह खासगी विद्यापीठांना ही होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मत ही पेरा संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.