पुणे प्रवाह न्युज पोर्टल
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात यंदाच्या गणेशोत्सवाला बंधनांची मर्यादा आहे. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीने यंदाच्या गणेशोत्सवात एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. या अनोख्या उपक्रमाअंतर्गत मालिकांच्या सेटवरील तंत्रज्ञ आणि कामगारांच्या घरी बाप्पाची मूर्ती पोहोचवण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पडद्यामागील कलाकारांच्या घरी स्टार प्रवाह वाहिनी बाप्पाची मूर्ती सुखरुपरित्या पोहोचवणार आहे.
मालिकेच्या निमित्ताने आपण कलाकारांना दररोज भेटत असतो. या कलाकारांना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात सेटवरच्या तंत्रज्ञांचा खूप मोलाचा वाटा असतो. सेटवरचे लाईटमॅन, स्पॉट दादा, मेकअपमन ही मंडळी टीव्ही इण्डस्ट्रीचा महत्त्वाचा हिस्सा. त्यांच्याशिवाय सेटवरच्या कामाचा श्रीगणेशा होत नाही असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. कोरोनाच्या संकटामुळे वाहतूकीला खूप मर्यादित पर्याय आहेत त्यामुळे यंदा बाप्पाला घरी आणायचं कसं हा प्रश्न सेटवरच्या या मंडळींना सतावत होता. आणि म्हणूनच प्रकाशझोतात न आलेल्या या खऱ्या हिरोंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं स्टार प्रवाह वाहिनीने ठरवलं. सरकारी सुचना आणि योग्य प्रकारे काळजी घेत स्टार प्रवाहच्या वतीने बाप्पाची मूर्ती या तंत्रज्ञांच्या घरी पोहोचवण्यात आली.
मुंबईतल्या नालासोपारा, चांदिवली, गोरेगाव, ठाणे आणि मुलूंड या भागात स्टार प्रवाहच्या विशेष गाडीने बाप्पाची मूर्ती पोहोचवण्यात आली. या उपक्रमात वरुण राजानेही साथ दिली. धो धो पाऊस सुरु असतानाही निर्विघ्नपणे स्टार प्रवाह वाहिनीचा हा अनोखा उपक्रम पार पडला.