स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका रंजक वळणावर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे :- राजमाता जिजाऊ म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी आई’ आणि ‘कणखर राज्यकर्ती’ अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेली सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे. दरम्यान, मालिका आता एका वेगळ्या उंचीवर आली असून, कधानक पुढे सरत जाईल तसतशी मालिका नव्या वळणावर येणार आहे. 


 


जिजाऊंचे पुण्यातलं आगमन हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. महत्त्वाच्या घडामोडींच केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पहायला मिळणार आहेत. पुण्याच्या वेशीवर पहार उखडणे, सोन्याच्या नांगराने नांगरलेली जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लालमहालाची बांधणी यातलं नेमकं काय बघायला मिळणार? याबाबतची उत्सुकता आगामी येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील दादोजी कोंडदेव यांचे पात्र कशा प्रकारे रंगविले जाईल ? याची उत्सुकता देखील आहेच याबद्दल बोलताना निर्माते सांगतात की इतिहासाला अनुसरूनच हे पात्र असणार आहे. जिजाऊंच्या पुण्यात घडणाऱ्या घडामोडींवरील हे विशेष भाग शुक्रवार २८ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळतील.


 


जिजाऊंनी निर्धार, अफाट प्रज्ञा, अपूर्व धाडस आणि विजीगिषू वृतीने सर्व संकटांवर मात केली. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण व त्याचे वेगवेगळे पदर याचा रंजक तितकाच गौरवशाली इतिहास येत्या काही दिवसात ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत पहायला मिळणार आहे.


 


स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी, वर्धनासाठी जिजाऊंचे योगदान अजोड आहे. जिजाऊंच्या कर्तृत्वाचे असंख्य पैलू उजेडात आणणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्रौ ८.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.