१२८ वर्षोची परंपरा खंडित...... यंदा दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना मंदिरात नव्हे तर मंडपात च........

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


१२८ वर्षांत पहिल्यांदाच परंपरा खंडित दगडूशेठ गणपती उत्सव यंदा मांडवाऐवजी मंदिरात; दर्शनही बाहेरूनच!


 


 


   प्रसिद्ध पुण्याच्या गणेशोत्सवाच्या वैभवशाली परंपरेत मानाचे स्थान असलेल्या श्रीमंत गणपतीचा उत्सव यंदा पहिल्यांदाच मांडवाऐवजी मंदिरात साजरा होणार आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या १२८ वर्षांत गणेशोत्सव पहिल्यांदाच मांडवाऐवजी मंदिरात होणार आहे. देशातील प्रसिद्ध मंदिरांची दगडूशेठतर्फे दरवर्षी उभारण्यात येणारी प्रतिकृती आणि त्यावरील विद्युत रोषणाई हा देशभरात कौतुकाचा विषय असतो. यंदा ही परंपरा खंडित होणार आहे.


 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून ट्रस्टने बेलबाग चौकापाशी मांडव न थाटता मंदिरातच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


 


दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाचे १२५ वे वर्ष विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. परंतु पुण्यात कोरोनामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळातर्फे साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच दगडूशेठ गणपतीची मूर्ती मंदिरातून मंडपात हलविण्यात येणार नाही. मंदिरातच सर्व धार्मिक विधी केले जातील. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने पुणेकर आणि देशभरातील गणेशभक्त येतात. मास्क घातल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.‌ सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे, असं गोडसे यांनी सांगितलं. तर, नियम न पाळल्यास मंडळांवर कारवाई केली जाईल, असं पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितलं.


 


मंडपावरून मंडळांमध्ये विभागणी


मंडप थाटण्याऐवजी मंदिरातच उत्सव साजरा करावा, या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल मंडई मंडळाने पहिल्यांदा अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंडळांना हेच आवाहन केल्यानंतर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. शहरातील प्रमुख पन्नास मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. छोटेखानी मंडप थाटून उत्सव साजरा करण्याच्या भूमिकेवर मानाचे आणि इतर काही गणपती मंडळे ठाम असल्याने मांडव थाटण्याच्या मुद्यावरून मंडळांमध्ये विभागणी झाल्याचे दिसून येत आहे.


 


 ऑनलाइन दर्शन आणि विविध कार्यक्रम ऑनलाइन


 


 उत्सव काळात आरोग्यविषयक जनजागृती; आरोग्यसेवा


 


मंदिराबाहेरून दर्शन; मंदिरामध्ये प्रवेश नाही


 


हार, फुले, पेढे, नारळ स्वीकारले जाणार नाही तसेच प्रसाद वाटप नाही


 


उत्सवाचे आकर्षण सामूहिक महिला अथर्वशीर्ष पठण, विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण हे कार्यक्रम रद्द


 


भक्तांच्या स्वहस्ते होणारा अभिषेक रद्द; नाव नोंदणी केल्यास केवळ गुरुजींद्वारे अभिषेक


 


दर्शनासाठी बेलबाग आणि बुधवार चौक येथे एलइडी स्क्रीन; ६० सीसीटीव्ही कॅमेरे


 


 


. या वेबसाइटसह ट्रस्टच्या फेसबुक, यूट्यूब, टि्वटर, इन्स्टाग्राम या पेजद्वारे ऑनलाइन दर्शन; सकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजता आरती