पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आॅनलाईन मोफत संस्कृत भाषा अभ्यासवर्ग -
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचा पुढाकार ; शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश
पुणे : जर्मन, फ्रेंच, इंग्रजी इत्यादी विषयांचे क्लासेस सहज उपलब्ध होतात. मात्र, सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतचे क्लासेस मोठया प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणार्थ आॅनलाईन मोफत संस्कृत भाषा अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टने या उपक्रमाकरीता पुढाकार घेतला आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असणार आहे, अशी माहिती ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक व प्राचार्य डॉ़ राजेंद्र खेडेकर यांनी दिली.
आयुर्वेदाचार्य व संस्कृत पारंगत डॉ.सायली देशमुख-शारंगधर या संस्कृत भाषेचे अभ्यासवर्ग घेणार आहेत. केंद्रीय मंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्रस्टने हा उपक्रम राबविला आहे. पुण्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग खुला करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी ९८२२८७०१२० दूरध्वनी क्रमांकांवर आपले नाव, पत्ता, शाळेचे नाव, इयत्ता व व्हाट्सअँप क्रमांक पाठवावेत. प्रवेश मर्यादित असून संपूर्ण शिक्षण हे आॅनलाइन असणार आहे.
डॉ.राजेंद्र खेडेकर म्हणाले, नाव नोंदविणा-या विद्यार्थ्यांना त्या त्या वेळी अभ्यास वर्गाच्य्या लिंक पाठवण्यात येतील. वर्ग सुरू होण्याच्या अगोदर दहा ते पंधरा मिनिटे प्रत्येक विद्यार्थ्याने लॉगिन व्हायचे आहे. प्रत्येक वर्गाच्या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. सलग दोन वर्ग अनुपस्थित असणा-या विद्यार्थ्यांचे नाव कमी करून नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्यामुळे याविषयी वर्गाकडे अत्यंत गांभीर्याने पहावे आणि वर्गात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.