स्टेट बँकेकडून 'सीआयएसएफ'ला पीपीई किटचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) वतीने पुणे विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या लढाईत सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेले १०० पीपीई किट, १०० सॅनिटायझर, १०० फेस शिल्ड, १०० ज्यूट बॅग आदी साहित्य देण्यात आले. 'एसबीआय'चे उप महाप्रबंधक श्री. पी. शेषू बाबू यांच्या हस्ते हे सर्व साहित्य 'सीआयएसएफ'चे डेप्युटी कमांडंट श्री संतोष सुमन व असिस्टंट कमांडंट श्री. जी. जी. भार्गव यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी रिजनल मॅनेजर श्री. मनीष चंद्रा, ब्रांच हेड श्री. एस. ए. शेंडे, मॅनेजर (लायजन) श्री. जयंत सिन्हा, शशिकला पाटील, श्री. कृष्णा कुलकर्णी आदी उपस्थित होते.


               श्री. पी. शेषू बाबू यावेळी म्हणाले, "स्टेट बँकेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कृषी विकास, जलसंवर्धन, वृक्षारोपण, ग्रामीण आर्थिक विकास आदी उपक्रम राबवले जात आहेत. समाजाप्रती आपले योगदान असावे, या कर्तव्यभावनेतून अधिकाधिक मदतकार्य देण्याचा प्रयत्न नियमितपणे करत असते. यासह कोरोना महामारीच्या काळात बँकेच्या वतीने अखंडपणे आर्थिक सेवा पुरविली जात आहे. 'एसबीआय'च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास २०० कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिले आहेत. स्थानिकपासून राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे काम बँकेने केले आहे."


            "कोरोना संकटात गरजुंना दिलासा मिळावा, यासाठी बँकेच्या वतीने पुणे शहर आणि ग्रामीण भागात अन्नधान्याचे वाटप केले. 'इस्कॉन'च्या 'अन्नामृत' उपक्रमांत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात २५ दिवस रोज २५०० लोकांना जेवण दिले गेले. पुणे महानगरपालिकेला १२०० पीपीई किट, पूना हॉस्पिटलला ४०० एन-९५ मास्क, पुणे शहर पोलिसांना ३०० मास्क, ३०० फेसशिल्ड, ३०० सॅनिटायझर देण्यात आले. याशिवाय सर्व प्रकारची काळजी घेऊन ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. पुण्यातील तीन रुग्णालयांना व्हेन्टिलेटर्स दिले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत. बँकेच्या वर्धापनदिनी ५००० झाडे लावण्यात आली आहेत," असेही श्री. बाबू यांनी नमूद केले.