पुणे प्रवाह न्युज पोर्टल
शिरूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा
*शिरूर व न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र सुरू करावे*
- कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील
पुणे दि.2 : - कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासोबतच तातडीने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी तसेच ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करावे, असे निर्देश कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिले. कोरोनाबाधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्यावा तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज शिरूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा आढावा घेतला. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देखमुख यांच्यासह शिरूर तालुक्यातील प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यासोबतच 700 बेडच्या कोवीड केअर सेंटरची उभारणी तसेच शिरूर व न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कोवीड केअर सेंटर व आवश्यक तिथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घेण्यात येणार असून इंडियन मेडीकल असोसिएशनच्या सदस्यांनी यासाठी सेवा देणार असल्याचे सांगितले. याशिवाय शिरूर तालुक्यासाठी दोन हजार अँटीजेन कीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घ्यावी तसेच ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणाचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कोविड सेंटरमध्ये जैव-वैद्यकीय कचरा, भोजन व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा तसेच उपचाराबाबत दक्षता घ्या. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून यापुढील काळात अधिक काळजी घ्यावी लागणार असून नागरिकांनी यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नियमांचे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते.