पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : कोरोनासारख्या संकटकाळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्धे पत्रकारांसाठी व नागरिकांसाठी सामाजिक विविध संस्थाच्या माध्यमातून पुण्यात कोविड केअर सेन्टरची उभारणी झाली ही कौतुकाची बाब असून बाधीत पत्रकारांना येथे तातडीने सुविधा मिळेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
कर्वे स्त्री शिक्षण संस्था वर्किंग हॉस्टेल मध्ये पत्रकार व नागरिकांसाठी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनवेळी फडणवीस बोलत होते.
यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ उपमहापौर सरस्वती शेंडगे,आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, मुकुंद भवन ट्रस्ट संचालक पुरुषोत्तम लोहिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाहक महेश करपे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्य किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र कॊरोनाची राजधानी झाली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 40 ते 41 टक्के मृत्यूही महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील कॊरोनाची परिस्थिती गंभीर आहे. लागण होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तेव्हाच आपण या संकटातून बाहेर येऊ.अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुकुंद भवन ट्रस्ट, लोहिया परिवार संचलित श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, समर्थ भारत पुनर्रबांधणी योजना यांच्यामार्फत कोविड केअर सेंटर सारख्या सेवा देण्यात येत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
शहरातील कॊरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याचे सांगून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, लॉकडउनमध्ये वृत्तांकनाची जबाबदारी पेलवणाऱ्या पत्रकांरासाठीही कोविड केअर सेन्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ही चांगली बाब आहे. यापुढील काळात ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज आहे; यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे शहरात गरवारे कोविड केअर सेन्टरची सेवा काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी विविध संस्थांचे सहकार्य मिळत आहे. खऱ्या अर्थाने पत्रकारही कोविड योद्धा आहेत त्यामुळे नागरिक आणि पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करत आहोत, असे महेश करपे यांनी सांगितले
शहरात करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी मुकुंद भवन ट्रस्ट लोहिया परिवार संचलित विविध संस्था कटिबद्ध आहेत, पत्रकारांसाठी भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही पुरुषोत्तम लोहिया यांनी दिली.
सूत्रसंचालन सत्येंद्र राठी यांनी केले, आभार नितीन बिबवे यांनी मानले.
फोटो ओळ: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून कोविड केअर सेन्टरचे उद्घाटन करण्यात आले.