पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात;
जव्हारमधील आदिवासी पाडय़ांतील गर्भवती महिला,
रुग्णांचे रस्त्याअभावी हाल.........
कासा : जव्हारहून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर डोंगर दरीखोऱ्यात वसलेल्या दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी आणि भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे आजही सोयीसुविधांपासून दूर आहेत. या गावपाडय़ांत दळणवळणाची सोय नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी वृद्ध आणि गर्भवतींना रुग्णालयात नेताना ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्याच वेळी शाळकरी मुले आणि नोकरदारांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. आजारी व्यक्तीला लाकडाच्या साह्य़ाने डोली करून सहा ते सात किलोमीटर अंतर तुडवत झाप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे. या ठिकाणी सुविधा नसल्याने २५ किलोमीटरचे अंतर पार करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात यावे लागत आहे. दरम्यान प्रवासी वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना उपचारांअभावी जीव गमवावा लागत आहे. यातील दखण्याचापाडा, वडपाडा आणि उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतीत मनमोहाडी ऐन ग्रामपंचायत तर भाटीपाडा कुकडी हे पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या पाडय़ांची एकूण लोकसंख्या एक हजार ४०० इतकी आहे. येथील शिक्षण घेत असलेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना हाल सोसावे लागत आहेत. मनमोहाडी या पाडय़ात ८० घरे असून त्यांना नदी ओलांडूनच रस्त्यावर यावे लागत आहे. मात्र, पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहू लागल्यानंतर या गावचा उर्वरित भागांशी असलेला संपर्क तुटतो.