पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पिस्ता खाण्याचे हे फायदे ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्…...
पुणे :- सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणं गरजेचं आहे. सुक्या मेव्यामध्ये वापरला जाणारा पिस्ता सर्वानाच परिचित आहे. पिस्ता हे छोटय़ा आकाराचे चविष्ट व कठीण कवचाचे पौष्टिक फळ आहे. त्याचे कवच टणक, परंतु द्वीदल असते. पिस्त्याच्या गरावर एक साल असते. त्याच्या आतील गराचा रंग हिरवट पिवळा असतो. पिस्त्याचे झाड आकाराने खूप मोठे व डौलदार असते. त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूंनी सारख्या असून पानांनी बहरलेल्या असतात. पिस्त्याची झाडे इराण, अफगाणिस्तान, फ्रान्स, अमेरिका, तुर्कस्तान या भागामध्ये जास्त आढळतात. पिस्त्याला संस्कृतमध्ये म्युकुलका किंवा निकोचक, हिंदीमध्ये पिस्ता, इंग्रजीमध्ये पिस्ताचिओनट व शास्त्रीय भाषेत पिस्तासिया व्हेरा या नावाने ओळखले जाते.
औषधी गुणधर्म-
पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे.
पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.
उपयोग – पिस्त्यामध्ये जीवनसत्त्वातील थायमिन, नायसिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन हे घटक असल्यामुळे मज्जा संस्थेच्या कार्यासाठी पिस्ता सेवन उत्तम ठरते. दुधामध्ये पिस्त्याची पूड टाकून प्यायल्यास मेंदूचे कार्य उत्तम प्रकारे चालते. थकवा, नराश्य ही लक्षणे जाणवत नाहीत. स्मृतिभ्रंश, विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत. चांगले कोलेस्टेरॉल निर्माण होऊन हदयविकार टाळण्यासाठी नियमितपणे पिस्ता सेवन करावे.