भागवताचार्य वा.ना.उत्पात यांचे करोनामुळे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


भागवताचार्य वा.ना.उत्पात यांचे करोनामुळे निधन.....


(मंदार लोहोकरे )


सोलापुरः पंढरपूर येथील प्रसिद्ध भागवताचार्य वासुदेव नारायण उर्फ वा.ना उत्पात यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ८० वर्षाचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सावरकर प्रेमी, कट्टर हिंदुत्ववादी, पत्रकार, माजी नगराध्यक्ष, निवृत्त शिक्षक असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 


वा.ना. उत्पात हे हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून प्रसिध्द होते.त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला, तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. सावरकरांच्या विचाराचे साहित्य संमेलन सुरु करण्याची संकल्पना त्यांचीच होती.त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते. वा.ना उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव असून त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भुषविले होते. शिवाय ते येथील प्रसिध्द शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी आयुष्यभर अध्यापनाचे कार्य केले. कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. उत्पात यांनी सुरूवातीला येथील गजानन महाराज मठ येथे २१ वर्षे ज्ञानेश्वरी. तसेच रुक्मिणी मंदिरात भागवत कथा, रुक्मिणी स्वयंवर प्रवचन केले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली व भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून भव्य वास्तू व क्रांती मंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय देखील केली होती.