पुणे प्रवाह न्युज पोर्टल
_रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना_
**_
पुणे,दि. 18 : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 'कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी तसेच 'कोरोना'बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम सुरु केली आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा असून या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे, कोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे आहे. जम्बो रुग्णालयातही बेड वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाचा तपशील व पुढील नियोजन, सामाजिक कृतिशील समूह समिती, ऑक्सीजन पुरवठा नियोजन, बेड उपलब्धता, पुणे जिल्हयाची अनुमानित रुग्णसंख्येचा तपशील, अनुमानित बेड संख्येचा तपशील, आवश्यक असणा-या बेडसाठी प्रस्तावित उपाययोजना, व्हेंटीलेटर उपलब्धता आदी उपाययोजनांची माहिती दिली.
जमाबंदी आयुक्त तथा ससूनचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णांलयातील व्यवस्थापन व उपचार पध्दतीची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
******