पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*'जम्बो'मध्ये करोना रुग्णांना असा मिळतो प्रवेश*
पुणे : जम्बो कोविड रुग्णालयात प्रमाणित केंद्रीय पद्धतीने रुग्णांना प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी पुणे महापालिकेची कोविड बेड हेल्पलाईन किंवा इतर कोविड रुग्णालयांच्या संदर्भानेच प्रामुख्याने प्रवेश देण्यात येत आहेत. तरी व्यापक हिताच्या दृष्टीने या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.
आज जम्बो रुग्णालयात 51 नवीन करोना बाधित रुग्ण दाखल करून घेण्यात आले.
पुणे महापालिकेच्या 020-25502110 या हेल्पलाईनला रुग्ण वा त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा. तेथून COEP जम्बो कोविड सेंटरशी समन्वय साधून केला जाईल. त्यामध्ये करोनाबाधित रुग्णांचे पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण करून आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाते.
1) तीव्र लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह, 2) गृह विलगीकरणातील मात्र ऑक्सिजनची गरज आहे असे, 3) कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटल यांच्याकडून संदर्भांकित रुग्ण या तीन परिस्थितीतील रुग्णांकरिता मनपाच्या हेल्पलाईनकडून COEP जम्बो सेंटरच्या साह्याने बेड निश्चित करण्यात येईल.
4) लक्षणे नसलेलेे किंवा सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगिकरणात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. आणि 5) रुग्णांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. मात्र संशयित करोना रुग्णांना तीव्र लक्षणे असल्यास त्यांची अँटिजेन चाचणी केली जाईल.
किंवा या परिस्थितीत स्वॉबची RT-PCR चाचणी घेतल्यास रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. आणि चाचणीचे निष्कर्ष येईपर्यंत लक्षणांच्या अनुषंगाने उपचार केले जातात.
पॉझिटिव्ह आढळल्यास ट्राएज रुममध्ये डॉक्टर रुग्णांना स्थिर करून पुढील उपचारांची रुपरेषा ठरवतात. नोंदणी करून रुग्णांना संबंधित वॉर्डमध्ये प्रवेश देण्यात येतो.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन ज्यांना निरीक्षणाखाली ठेवून उपचार करणे आवश्यक आहे अशा रुग्णांना प्राधान्याने प्रवेश देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रवेश देण्यासाठी सर्वत्र स्वीकारली जाणारी ही केंद्रीय पद्धत अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.