पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे : "प्राप्तिकर परतावा भरण्यात तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरत आहे. 'ई-फायलिंग'चे प्रमाण वाढले असून, जवळपास ९० टक्के ई-फायलिंग सुरळीतपणे भरले जात आहेत. डिजिटलायझेशनमुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. करदात्यांना कर भरण्यासाठी अधिकाधिक सोयीची आणि दोषमुक्त प्रणाली उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. सीपीसी २.०, मोबाईल ऍप, चॅट बोट आदी अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीन प्रणालीमुळे आगामी काळात ते शक्य होईल. " असे मत डीआयटी डॉ. सीबीचेन मॅथ्यू यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, सीपीसी आयटीआर बंगळुरू आणि 'आयसीएआय'च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्राप्तिकर परतावा भरण्याची प्रक्रिया आणि ई-फायलिंग (ई-फायलिंग अँड प्रोसेसिंग ऑफ आयटीआर) यावर आयोजित मार्गदर्शन सत्रात डॉ. मॅथ्यू बोलत होते. प्रसंगी पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, प्राप्तिकर विभागातील अधिकारी सजीत कुमार, श्रीमती सोम्या आचर, सरेन जोस, बी. एल. गुरु प्रसाद, व्ही राजशेखर, 'डब्ल्यूआयआरसी'चे चेअरमन सीए ललित बजाज, डायरेक्ट टॅक्स कमिटीचे चेअरमन सीए जयेश काला, खजिनदार सीए आनंद जाखोटिया आदी उपस्थित होते.
सीए अभिषेक धामणे यांनी सांगितले की, सीपीसी २.० ला अनुसरून नवतंत्रज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचे काम सीए इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ब्लॉकचेन, रोबोटिक्स प्रोसेस ऍटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग आदींचा वापर 'आयसीएआय'मध्ये केला जात आहे. सीपीसी-आयटीआर कार्यप्रणालीवर डीआयटी डॉ. सीबीचेन मॅथ्यू यांनी मार्गदर्शन केले. ई-फायलिंग, प्रोसेसिंग-प्रिप्रोसेसिंग, ग्रीव्हन्सेस रीड्रेसल आदी विषयांवर सजीत कुमार, श्रीमती सोम्या आचर, सरेन जोस, बी. एल. गुरु प्रसाद, व्ही राजशेखर यांनी मार्गदर्शन केले.